महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीसांसोबतच ८० तासांचं सरकार बनवणारे अजित पवार हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय झाले. अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची धुरा देण्यात आली. मविआ सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादीला बळ देण्याचं काम अजित पवारांनी केले. त्याचसोबत पुणे, पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून पुण्याची जबाबदारी घेतली होती.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पुन्हा भाजपा सरकारमध्ये आली. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांची जागा घेतली. आता याचसोबत आणखी एकदा फडणवीस अजित पवारांची जागा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा वाढता प्रभाव पाहता देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचं पालकमंत्रिपद घ्यावं अशी मागणी सातत्याने भाजपा कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे.
भाजपा कार्यकर्त्यांच्या याच मागणीला दुजोरा देत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात सूतोवाच केले आहे. पुण्यातील एका शिष्टमंडळाला भेट देताना पाटलांनी तुम्ही आता पुढे व्हा अन् तुमच्या पालकमंत्र्यांशी बोलून घ्या असं सांगत फडणवीसांकडे इशारा केला. ते पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पुण्यात अजित पवारांचा दबदबा आहे. त्यालाच सुरुंग लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार हे आता जवळपास निश्चित असल्याचं बोलले जात आहे.
अलीकडेच पुण्यातीलच एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने याला दुजोरा दिला. आधीचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार होते. आताच्या सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनीच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होणे योगायोग साधल्यासारखे होईल असे मजेने सांगत या कार्यकर्त्यांनी पुणे महापालिका निवडणूक, पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असे मुद्दे फडणवीस यांच्यापुढे मांडले. तेव्हा ‘बरोबर आहे तुमचे’ अशा अर्थाने नेहमीसारखी मान हलवत त्यांनी मूक संमती दिली, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.