महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीची ‘तारीख पें तारीख’ सुरु असताना तसेच शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा? याचा सर्वोच्च फैसला बाकी असतानाच इकडे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मात्र धनुष्यबाण शिंदे गटाकडेच राहणार असल्याचा दावा केला आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता कोणतं चिन्ह घ्यावं, यासंबंधीचे २ पर्याय देखील सुचवले आहेत. गेल्या दीड महिन्यापासून शहाजी बापू पाटील संजय राऊत, ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेत आहेत. आज त्यांनी थेट ठाकरेंनाच सल्ला देऊन टाकला .
उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातून शिवसेना पक्ष काढून घेण्याच्यादृष्टीने एकनाथ शिंदे यांच्या गटाने निर्णायक पाऊल उचलले आहे. एकनाथ शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात एकनाथ शिंदे गटाने आपल्यालाच शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ‘शिवसेना कोणाची?’ या प्रश्नावरून आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात असणारी लढाई आता निवडणूक आयोगाच्या दारात जाऊन पोहोचली आहे. हा शिवसेनेसाठी आणखी एक धक्का मानला जात आहे. तसेच शिंदे गटाच्या नेत्यांकडून आम्हीच खरी शिवसेना, धनुष्यबाण आमचाच, असे दावे केले जात आहेत. शहाजीबापू पाटील तर जिथे जातील तिथे धनुष्यबाण आमचाच म्हणून सांगत आहेत.
“धनुष्यबाण आमचा आहे.. तो आम्हाला मिळणारच आहे.. आमचा फॉर्म धनुष्यबाण म्हणून लिहून ठेवलाय आम्ही… ठाकरे गटाने त्यांचे फॉर्म कशावर भरायचे, हे आता उद्धव ठाकरे यांनी ठरवायचं…त्यांना देखील वाईट वाटायचं काही कारण नाहीये. उगीच भांडत बसलेत… धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना,,, उद्धव ठाकरेंनी ढाल तलवार घ्यायची…शस्त्र काय कमी आहेत होय…? लागतील एवढी शस्त्र आहेत.. घ्या कुठलं पण लागा तयारीला.. उतरा मैदानात”, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.