महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याचा आरोप झाल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही नवीन मंत्री आज बाळासाहेबांच्या समाधीस्थळावर गेलो होतो. मी उद्धव साहेबांवर (Uddhav Thackeray) टीका केल्याचं वृत्त आलं होतं. पण मी कधीच उद्धव ठाकरेंवर टीका केली नाही आणि करणारही नाही. हे मी आधीच सांगितलं आहे, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. ते आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर टीका केल्याचा आरोप झाल्यानंतर दीपक केसरकरांनी स्पष्टीकरण दिलंय. संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, तेव्हा सगळेच त्यात सहभागी होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याबद्दल बोलताना, ‘माझा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण केला’, असं म्हटलं होतं. त्यामुळे बाळासाहेब सर्वांचेच झाले. ते राज्याची अस्मिता आहेत. ते महाराष्ट्राचे होते, एवढंच मी बोललो. पण ती उद्धव साहेबांवर टीका केलेली नव्हती, असं केसरकरांनी (Deepak Kesarkar) यावेळी स्पष्ट केलं.
बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनाप्रमुख होतेच, पण त्याही पलीकडे त्यांचे स्थान होते. बाळासाहेबांवर सगळ्यांचा हक्क आहे; पण तो प्रेमाचा हक्क आहे. त्यांना दैवताप्रमाणे आम्ही पूजतो. कोणताही गैरसमज झाला असेल तर ते मी दूर करतो, असंही केसरकर म्हणाले. माझी स्वतःची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. प्रत्येक पक्षाची पार्श्वभूमी मी अनुभवली आहे. रेशीम बाग येथे जाण्यात काही कमीपणा नाही. कुठलेच मतभेद नाहीत. मी मुद्द्यांवर बोलतो. कुणा व्यक्तीवर नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी केसरकरांनी संजय राठोड यांच्याबाबत सुरू असलेल्या आरोपांवरही भाष्य केलं. ते म्हणाले, ‘जोपर्यंत दोष, आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत आपण त्या व्यक्तीला आरोपी म्हणत नाहीत. त्यांच्या समाजाचं शिष्टमंडळ राज्यात आलं होतं. त्यांनी बंजारा समाजावर अन्याय नको, असं म्हटलं आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार जेव्हा त्याचा तपास होईल आणि त्यातून काही समोर येईल, तेव्हाच मुख्यमंत्री कारवाई करतील. पण तोपर्यंत चित्रा वाघ म्हणतात त्यानुसार त्यांनी पाठपुरावा करावा, असंही केसरकर म्हणाले.