महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा-खंडाळ्यातील हॉटेल व रिसॉर्ट गर्दीने भरून गेले आहेत. आठवड्याचे अखेरचे दिवस व स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या सलग सुट्ट्या यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. लोणावळा व खंडाळा ही ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्रे आहेत.
पर्यटक लोणावळा परिसरातील भुशी धरण, राजमाची, लोहगड, एकवीरा-भाजे लेणी परिसर, पवना धरण परिसरात सर्व ऋतूमध्ये गर्दी करत असतात. लायन्स पॉइंट, खंडाळ्यातील राजमाची उद्यान, सनसेट पॉइंट येथेही पर्यटकांची पसंती मिळते. पावसाळ्यात वर्षा विहारासाठी पर्यटकांना वेड लागते. अलिकडच्या काही वर्षात स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीनिमित्त पर्यटनाचा ट्रेंड वाढू लागला आहे. या दिवशी लोणावळ्यात लाखोंच्या संख्येने गर्दी होते. गेली दोन वर्षे कोविड आपत्ती, पडणारा उच्चांकी पडणारा पाऊस यामुळे येथील पर्यटनस्थळे बंद केली. साहजिकच पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले होते. यंदा, मात्र शनिवार, रविवारला जोडून सोमवारी स्वातंत्र्य दिन व मंगळवारी पतेती पारशी नववर्ष दिन अशा सलग चार दिवस जोडून सुट्या आल्याने पर्यटकांची चंगळ आहे. हॉटेल्स व रिसॉर्टस आरक्षित केले आहे.
या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वर्दळ सुरू झाल्याने व्यावसायिकांमध्ये चैतन्य पसरले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्ला येथील निवासस्थानातील सर्व खोल्या शंभर टक्के बुक झाल्या आहेत.