‘ताई चुकीच्या वेळेला माझ्याकडे आलात, माझ्याकडे द्यायला काहीच नाही’

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । सध्या सोशल मीडियावर शिवसेनेच्या नवनिर्वाचित उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. आंबेडकरी चळवळीतील सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधले होते. शिवसेनेची पडझड सुरु असताना आक्रमक बाण्याच्या सुषमा अंधारे यांच्या रुपाने पक्षाला एक उत्तम नेता मिळाला होता.

त्याच सुषमा अंधारे यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने फेसबुक पोस्ट टाकून शिवसेना पक्षप्रमुख यांच्याबाबतचा एक किस्सा सांगितला . मी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता मातोश्रीवर गेले होते, असे अंधारे यांनी म्हटले. मी उद्धव ठाकरे यांना भेटायला पहिल्यांदा मातोश्रीवर गेले होते. पहिल्याच भेटीतलं उद्धव साहेबांचं पहिलंच वाक्य होतं , “ताई तुम्ही अत्यंत चुकीच्या वेळेला माझ्याकडे आलात माझ्याकडे द्यायला काहीच नाही” राजकारणात इतकं सरळ आणि इतकं स्पष्टपणे कुणी कसं बोलू शकतं? क्षमता असेल किंवा नसेल पण किमान कार्यकर्ता आपल्याला जोडूनच घ्यायचा आहे म्हणून तरी पुढारी खोटी वचनं. आश्वासन किंवा आमिष दाखवेल. पण यातलं काहीच घडलं नाही. उलट ते मला सांगत होते की, मी काहीच देऊ शकत नाही मी एकटा आहे तुम्ही आलात तर तुमच्यासह नाही आलात तर तुमच्या शिवाय पण मी लढायचं हे नक्की ठरवलं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याची आठवण सुषमा अंधारे यांनी सांगितली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन अत्यंत शांत संयमाने कुठलाही आकांडतांडव न करता मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल हा आक्रसताळेपणा न करता सगळा राजपाट सोडून वर्षा बंगल्यावरून परत येत होते. तेव्हा शिवसेनेशी अजिबात संबंध नसलेल माझं संपूर्ण कुटुंब डोळ्यात पाणी आणून त्यांचे राजीनाम्याचे भाषण जीव एकवटून ऐकत होतं. बंगल्यावरून सन्माननीय मुख्यमंत्री निरोप घेत असताना कोरडवाहू शेतात राबणारी माझी आई घरात रडत होती. कोरोना काळात आपल्या घरातला बाप भाऊ म्हणून एवढी आपली काळजी घेणारा देवमाणूस त्याच्या वाट्याला असा विश्वासघात का आला असेल? हा तिचा भाबडा प्रश्न.

हा क्षण माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण होता. महाविकासआघाडीच्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गणराज्य संघ काम करत आहे तिथे कोणीही दुखावलं नाही. आदरणीय पवार साहेब सुप्रियाताई यांनी तर प्रचंड काळजी घेतली. त्या क्षणाला हे मनापासून वाटलं की भविष्य काहीही असो. सत्ता असताना लाभाची पद असताना “जिकडे मेवा तिकडे थवा” असे ढिगाने सापडतील. पण या संकट काळात साथ द्यायला आपण उभे राहिले पाहिजे. आपला जीव लहान आहे आपल्या क्षमता किंवा आपल्याकडची संसाधन तुलनेने कमी असतील पण जो लढा सन्माननीय उद्धवसाहेब उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात एक शिपाई म्हणून आपण असलं पाहिजे. एक खारीचा वाटा उचलला गेला पाहिजे. असं प्रकर्षाने वाटलं, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *