आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमुळे संपूर्ण देश हादरला ; जालन्यातल्या ‘त्या’ कंपनीत बनतं तरी काय ? वाचा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । महाराष्ट्रातल्या जालना इथे आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या छाप्यात ५६ कोटी रुपये रोख आणि १४ कोटी रूपयांचे दागिने अशी एकूण ३९० कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जालन्यातील दोन मोठे स्टील व्यापारी, रिअल इस्टेट डेव्हलपर आणि कापड व्यापारी यांचे कारखाने, घरे, फार्म हाऊस आणि कार्यालयांवर आयटीने कारवाई केली होती.

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्टपासून स्टील टीएमटी बारच्या तयारीमध्ये गुंतलेल्या दोन मोठ्या गटांच्या ठिकाणी ही शोध मोहीम करण्यात आली. यादरम्यान जालना, औरंगाबाद, नाशिक आणि मुंबईतील व्यापार्‍यांचे ३० हून अधिक परिसर तपासून काढले. त्याचबरोबर ज्या कंपन्यांवर छापे टाकण्यात आले त्यात एसआरजे स्टील (SRJ Steel ) आणि कालिका स्टीलचा (Kalika Steel )समावेश आहे. या कंपन्यांशी संबंधित सहकारी बँक (Co-operative Bank), फायनान्सर विमल राज बोरा (Financier Vimal Raj Bora )आणि डीलर प्रदीप बोरा (Dealer Pradeep Bora)यांच्या ठिकाणांवरही शोध मोहीम राबवण्यात आली.

यामध्ये, एसआरजे पीटी स्टील्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (SRJ Peety Steels Private Limited )गेल्या ३७ वर्षांपासून धातू आणि रसायनांच्या उत्पादनांचा व्यवसाय सुरू आहे तर कालिका स्टील ही कंपनी टीएमटी बार बनवते. महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध कंपनी २००३ मध्ये सुरू झाली होती.

फिल्मी स्टाईलमध्ये झालेल्या या छाप्यात व्यावसायिक गट मोठ्या प्रमाणात करचोरी करत असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली आहे. टीमने एसआरजे स्टील आणि कालिका स्टील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने उघडलेले लॉकर्सही शोधून काढले. सहकारी बँकेत असलेल्या या लॉकर्समधून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. इतकंच नाहीतर, एका गटाच्या फार्म हाऊसवर असलेल्या गुप्त खोलीतून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. शोध मोहिमेत आतापर्यंत ५६ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि १४ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सगळ्यात गंभीर म्हणजे या छाप्यात सापडलेली रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाला १३ तास लागल्याचं सांगण्यात आलं. जालन्यातील स्टेट बँकेत नेऊन ही रोकड मोजण्यात आली. रोख मोजणीचे काम गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरू होऊन दुपारी १ वाजेपर्यंत सुरू होते. ही कारवाई १ ते ८ ऑगस्ट दरम्यान झाली आहे. आयकर विभागाच्या नाशिक शाखेने हा छापा टाकला होता. या कारवाईत राज्यभरातील २६० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. १२० हून अधिक वाहनं वापरण्यात आली होती. या सर्व अधिकाऱ्यांची ५ टीममध्ये विभागणी करण्यात आली होती.

जालन्यातील चार स्टील कंपन्यांमध्ये अनियमितता असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये घर आणि कारखान्यावर छापे टाकले. घरात काहीही सापडले नाही, परंतु शहराबाहेरील फार्महाऊसमधील गुप्त खोलीतून रोख रक्कम जप्त करण्यात आली. आयकर विभागाने स्टील व्यापाऱ्यांची घरे, कार्यालये, विविध ठिकाणच्या जमिनी, शेततळे, बंगले, बँकेतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता मिळाल्याचा दावा टीमने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *