महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यानं हे पद रिक्त झालं होतं, त्याजागी आता बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा भाजपकडून लवकरच करण्यात येणार आहे. (Chandrasekhar Bawankule BJPs new Maharashtra state president)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तर आमदार आशिष शेलार यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं आहे. या दोन्ही नियुक्त्या तत्काळ प्रभावानं लागू करण्यात आल्या आहेत.
भाजपनं प्रदेश भाजप कार्यकारिणीत खांदेपालट केले आहेत. त्यानुसार, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद देण्यात आल्यानं ही जबाबदारी बावनकुळे यांच्यावर देण्यात आली आहे.
दरम्यान, नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिल्यानं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि भाजपच्या संपूर्ण केंद्रीय नेतृत्वाचं तसेच देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. या जबाबदारीतून पुढच्या काळात मला सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील नंबर वन पक्ष असलेला भाजप आणखी पुढे कसा नेता येईल तसेच शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसा पोहोचवता येईल, याचा प्रयत्न करणार. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचंड ताकदीनं पक्ष उभा करण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. गेल्या २९ वर्षात पक्षानं माझ्यावर जी जबाबदारी दिली होती तो विश्वास मी सार्थ करुन दाखवीन”