भाजपची ‘प्लॅन बी’ची तयारी : सरकार जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीवर दबाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । मंत्रिमंडळ विस्तारातील नाराजीमुळे शिंदे गट सरकारातून कधीही बाहेर पडेल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव टाकून त्यांना खेचण्याचा प्लॅन बी भाजपतर्फे आखला जात असावा, अशी शंका सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या आधीच्या रात्री भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक बडा नेता लवकरच तुरुंगात दिसेल, असा दावा कंबोज यांनी मंगळवारी (ता. १६) केला. कंबोज यांचा रोख विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे आहे की माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याकडे आहे, यावर खल सुरू झाला आहे. दरम्यान, अधिवेशन काळात असे आरोप करून विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचे हे कारस्थान आहे, असा पलटवार खडसे यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेष सरकारी वकिलाच्या स्टिंग आॅपरेशनचे व्हिडिओ तेव्हाचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी विधानसभेत मांडले होते. त्यात गिरीश महाजनांपासून अनेकांना कसे गुन्ह्यांमध्ये अडकवून त्यांना अटक करायची याचे कारस्थान उघड करण्यात आले होते. त्या प्रकरणात आता संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात काही पोलिस अधिकारीदेखील असू शकतील, असेही सांगण्यात येत आहे. तसे झाले तर त्या प्रकरणात एकनाथ खडसे यांनाही आरोपी केले जाण्याची शक्यता असून त्यातच त्यांना अटक केली जाऊ शकते, असेही त्यांच्या विरोधकांकडून पसरविले जाते आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात खडसे यांना अटक होऊ शकते, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार जलसंपदामंत्री होते. तेव्हा सिंचन प्रकल्पांची कामे देताना हजारो कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते. मात्र, 2019 मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे 80 तासांचे सरकार स्थापन झाले होते तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंचन घोटाळ्याची केस बंद केली होती.

‘मी अजितदादांच्या त्या केसविषयी आणि कारवाईच्या संकेताविषयी बोलणार नाही. सिंचन घोटाळ्याच्या फाइलबाबत सरकार माहिती देईल. पण कंबोज यांचा स्ट्राइक रेट 100 टक्के आहे,’ असा दावा करत मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी कंबोज यांची पाठराखण केली. भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘गेल्या सरकारच्या काळातही सी समरी झालेल्या केस पुन्हा ओपन करून त्यांचा तपास करण्यात आला. त्यामुळे सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचीही मागणी होऊ शकते.’ एकूणच कंबोज यांच्या ट्वीटचा अर्थ आणि भाजप नेत्यांनी त्यांची केलेली पाठराखण यावरून अजित पवार यांची कथित सिंचन घोटाळ्याची ती फाइल पुन्हा रिओपन होणार, याचेच हे संकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *