महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । ज्यांना प्रतिशिवसेना भवन बांधायचेय, त्यांना बांधू द्या. देवळात देव राहिल्याशिवाय त्या देवळाला महत्त्व येत नाही. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना भवनाची वीट रचली होती. वेगळे नाव देऊन कोणी काहीही रचले तरी शिवसेना भवन आणि ‘मातोश्री’चे महत्त्व कायम राहणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, ‘महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेची सत्ता यावी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत,’ असे साकडे साईबाबांना घातल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदी केदार दिघे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी बुधवारी (दि. 17) शिर्डीत मध्यान्ह आरतीला हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले. साईबाबा संस्थानच्या वतीने केदार दिघे यांचा शाल व साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त सचिन कोते, सुमित शेळके, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शिंदे, सुयोग सावकारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले, मंगेश त्रिभुवन, कैलास कतोरे आदी उपस्थित होते.
केदार दिघे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनंतर सर्वसामान्य शिवसैनिकांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. नेते गेले असले तरी शिवसेना आणि शिवसैनिक जेथे होते तेथेच आहेत. शिवसेना आणि शिवसैनिकांना संघर्ष नवीन नाही. सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे अव्वल राहिले. त्यांनी फक्त मुख्यमंत्री म्हणूनच नाही, तर कुटुंबप्रमुख म्हणूनही काम केले. लोकांना आजही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पुन्हा यावेत, असे वाटत असल्याचेही केदार दिघे म्हणाले.