मुंबईला उडवण्याची धमकी : 26/11 सारखा भयंकर हल्ला करणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । मुंबईत 26/11 सारखा भयंकर हल्ला करण्याच्या धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. हा मेसेज पाकिस्तानातून आल्याची माहिती आहे. धमकी देणाऱ्याने स्वतः तशी माहिती दिली आहे. या मेसेजविषयी अद्याप पोलिसांचे स्पष्टीकरण आले नाही. पण यामुळे मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

‘आम्ही मुंबईला पुन्हा एकदा उडवण्याची तयारी केली आहे. यावेळीही 26/11 सारखा हल्ला केला जाईल. मी पाकिस्तानातून बोलत आहे. तुमचे काही भारतीयही आमच्यासोबत आहेत. त्यांचीही मुंबईला उडवण्याची इच्छा आहे. या हल्ल्यामुळे 26/11 हल्ल्याच्या स्मृती ताज्य होतील. ही धमकी नाही याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल.’

‘माझे लोकेशन पाकमध्ये ट्रेस होईल. पण काम मुंबईत होईल. आमचा कोणताही ठिकाणा नसतो. त्यामुळे लोकेशन तुम्हाला आऊट ऑफ कंट्री ट्रेस होईल. उदयपूरसारखा शीर धडावेगळे करण्याचाही हल्ला होऊ शकतो,’ असे मेसेज करणाऱ्याने म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला ही धमकी गांभीर्याने घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले – ‘यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक धमक्या मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे सरकारने या धमकीकडे गांभीर्याने पहावे.’

‘अशी प्रकरणे हाताळण्यासाठी राज्याची पोलिस यंत्रणा सक्षम आहे. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणांनीही या धमकीकडे लक्ष द्यायला हवे. या धमकीमागे कोणती शक्ती आहे? सध्या जगात हिंसेच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे धमकीमागे अतिरेकी संघटना आहे का? याचा तपास करायला हवा. राज्य तसेच केंद्र सरकार गांभीर्याने हे प्रकरण हाताळेल अशी अपेक्षा आहे,’ असे पवार म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे 2 दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्यात बोटीवर शस्त्रसाठा आढळून आला होता. यात 3 रायफलींसह काडतुसांच्या काही बॉक्सचा समावेश होता. त्यानंतर लगेचच हा धमकीचा मेसेज प्राप्त झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी कान टवकारलेत.

हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी ही संशयास्पद बोट आढळून आली होती. या घटनेनंतर रायगड, मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच महत्त्वाच्या शहरांत हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.

रायगडमधील संशयास्पद बोटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले होते -रायगडच्या हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर एक बोट दुर्घटना झालेल्या स्थितीत सापडली आहे. या बोटीत 3 AK-47सह काही काडतुसे सापडली आहेत. या बोटीचे नाव लेडी हान आहे. ही बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेची असून, तिचा कॅप्टन या महिलेचा पती आहे.

बोट मस्कतहून युरोपला जात होती. 26 जून रोजी या बोटीचे इंजिन निकामी झाल्यामुळे एका कोरियन युद्धनौकेने त्यांना मदत केली. त्याना ओमानला सुपूर्द केले. समुद्र खवळलेला असल्यामुळे बोट टोइंग करता आली नाही. त्यामुळे ती भरकट हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *