महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑगस्ट । भाजपच्या पहिल्या फळीतील नेते, दमदार डॅशिंग मंत्री, ज्यांच्या कामाने त्यांचं जगभरात आदराने नाव घेतलं जातं अशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने संसदीय समितीत स्थान दिलं नाही. नितीन गडकरी यांचा टॉप परफॉर्मन्स असूनही केवळ मोदी-शहांची री ओढत नाही, त्यामुळेच त्यांचे पंख छाटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या सगळ्यावर नितीन गडकरी काय बोलणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना आज नितीन गडकरी यांनी विकासकामांच्या दिरंगाईवर बोलताना सरकारला घरचा आहेर दिला आहे. प्रोजेक्ट आखले जातात, पण ते वेळेत पूर्ण कसे होतील, याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं सांगतानाच सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.
Addressing ‘NATCON 2022’ organised by the Association of Consulting Civil Engineers, Mumbai https://t.co/XzbWkbhZqQ
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 21, 2022
भारतीय जनता पक्षाच्या नव्या संसदीय समितीची घोषणा चार दिवसांपूर्वी करण्यात आली. या समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव वगळण्यात आलं. तेव्हापासून नितीन गडकरी यांची मोठी चर्चा आहे. नितीन गडकरी रोखठोक आणि निर्भीड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते हातचं राखून बोलत नाहीत. कार्यकर्त्यांचे कान उपटताना ते आपल्या वरिष्ठ नेत्यांनाही योग्य शब्दात ‘समज’ देतात. आज असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सने आयोजित केलेल्या ‘NATCON 2022’ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी केलेल्या भाषणात विकासकामांच्या बाबतीत निर्णय घेताना सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, असं विधान गडकरी यांनी केलं.
“बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. मात्र, सरकारची सर्वात मोठी समस्या ही आहे, की सरकार वेळेवर निर्णय घेत नाही. भारतात बांधकाम क्षेत्राचे भविष्य उज्वल आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला जगातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मेटरीयलला सुद्धा पर्याय शोधावे लागतील. जेणेकरून प्रकल्पाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता, त्याची किंमत कमी करत येईल”, असं गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले, “खरं सांगायचं तर आमच्याकडे पैशांचा प्रोब्लेम नाही. बँका वाटेल तेवढं कर्ज देण्यास तयार आहेत. प्रश्न आहे मानसिकतेचा.. पैसा उभा राहतो. पैशांची अडचण येत नाही. प्रोजेक्ट आखले जातात. मात्र ते वेळेवर पूर्ण होत नाही, याची कधी कधी खंत वाटते. म्हणून माझं प्राधान्य हे प्रकल्प आखणीबरोबरच ते वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे असतं. माझ्या खात्याचं बोलायचं झालं तर भारतभर धडाक्यात प्रोजेक्ट सुरु आहेत. अनेकानेक महत्वकांक्षी पोजेक्टवर काम सुरु आहे. सध्या टोलमधून वर्षाला 40 हजार कोटी आम्हाला उत्पन्न मिळतं. २०२४ पर्यंत हेच उत्पन्न १ लाख ४० हजार कोटीच्या आसपास असेल, असं सांगताना आता प्रकल्प उभारणीबरोबरच ते वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यायला हवं”, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.