शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’; दसरा मेळाव्याबाबतही स्पष्टच बोलले फडणवीस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेची शान असलेल्या दसरा मेळाव्यात खोडा घालण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

 

शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टींवर दावे ठोकण्याचा सपाटा दोन्ही बाजूंकडून सुरू आहे. अशावेळी यंदाच्या दसरा मेळाव्याला अधिकच महत्त्व आहे. यावेळी शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र त्यांना परवानगी देण्यासाठी खुद्द महापालिकेनेच आखडता हात घेतल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी याबाबत संवाद साधल्याचे समजते. मात्र, अद्याप त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. मात्र, गृहमंत्री म्हणून जे नियमात असेल ते करु असे वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर विमानतळावर त्याचे आगमन झाल्यावर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. तसेच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

दरम्यान, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकत प्रादेशिक आणि इतर विरोधी पक्षांना संपवण्याची भाषा सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी आणि शिवप्रेमातून शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती झाल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. शिवसेना आाणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्र येऊन पुढची वाटचाल करावी. महाराष्ट्रात संयुक्त मेळावे घ्यावेत. शेतकरी, आदिवासी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी एकत्र काम करावे, अशी इच्छा संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *