आधी परवानगी दिली अन् मग पलटी खाल्ली ; विनायक राऊतांनी सांगितलं राजकारण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेची शान असलेल्या दसरा मेळाव्यात खोडा घालण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टींवर दावे ठोकण्याचा सपाटा दोन्ही बाजूंकडून सुरू आहे. अशावेळी यंदाच्या दसरा मेळाव्याला अधिकच महत्त्व आहे. यावेळी शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र त्यांना परवानगी देण्यासाठी खुद्द महापालिकेनेच आखडता हात घेतल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी याबाबत संवाद साधल्याचे समजते. मात्र, अद्याप त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत आता ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या विस्मृतीचं राजकारण सुरू झालं आहे. शिवसेना दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये मेळावा घेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून ही पंरपरा चालू आहे. यंदा देखील दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी कधीच पत्र पाठवण्यात आले आहे. त्यांनी आधी परवानगी दिली, मात्र आता पलटी खाल्ली आहे. राजकारणाची हद्द पार झाली आहे. तसेच नीच राजकारण सुरू असल्याचे देखील विनायक राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. मात्र, गृहमंत्री म्हणून जे नियमात असेल ते करु असे वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर विमानतळावर त्याचे आगमन झाल्यावर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *