महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त आज अर्थवशीर्ष पठण करण्यात आले. पहाटे झालेल्या या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमामध्ये उत्सव मंडपासमोर ३१ हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले.अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदाच ३५ वं वर्ष आहे.
पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले.
गणेश नामाच्या जयघोषाने महिलांनी केलेल्या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमामुळे पुणेकरांची आजची पहाट मंगलमय झाली. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यावेळी उपस्थित होत्या.