महागाईचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; भाज्या कडाडणार, मसालेही महागले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । स्थानिक माल येण्यास असलेला विलंब आणि अगदीच साधारण अवस्थेत असलेली भाजीपाल्याची आवक यामुळे किरकोळ भाजीपाला बाजार महागलेला आहे. याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. ठोक भाजीपाला बाजारात दर काहीसे कमी असले तरी अशी स्थिती किरकोळमध्ये नाही. परिणामत: गणेशोत्सव आणि ज्येष्ठा गौरीदरम्यान ग्राहकांना भाजीपाला, मसाले, फुलांच्या दरवाढीचा हमखास सामना करावा लागणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भाजीपाल्याची आवक कमी आहे. त्यामुळे दरवाढ दिसून येत आहे. सध्या गणेशोत्सव आणि ज्येष्ठा गौरीमुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर अधिक वाढणार आहेत. ही स्थिती पुढील दहा दिवस राहणार आहे. भाजीपाल्याप्रमाणेच मसालेही महागले आहेत. विशेषत: हिंगाचा दर चांगलाच वधारला आहे. भारतात हिंगाची अफगाणिस्तान, इराण, ताजेकिस्तान, उजबेकिस्तान येथून आयात होते. त्याचप्रमाणे धन्याचा दर वाढला आहे. त्याशिवाय दूध, बासमती तांदूळ, ब्रेड आदींमध्येही दरवाढ झाली आहे. या सर्वांचा परिणाम महागाईच्या स्वरूपात ऐन सणासुदीच्या काळात दिसून येणार आहे.

महिनाभरात सोन्याचा दर चारशे रुपयांनी घटला आहे. सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ५२ हजारवरून ५१,६०० रुपयांवर आला आहे. चांदीचा दर प्रतिकिलो ५९,१०० रुपयांवरून ५५,१०० रुपयांवर आला आहे. दिवाळीत येणारी लग्नसराई पाहता सोने-चांदी खरेदीसाठी सध्या चांगले दिवस असल्याची माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *