काँग्रेसचा अध्यक्ष महाराष्ट्रातून? चर्चेदरम्यान नाना पटोलें नी केला खुलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्रातील नेत्यांच्या नावावर जोरदार चर्चाही सुरू आहे. सुशील कुमार शिंदे, नाना पटोले आणि मुकुल वासनिक यांच्या नावावर सोनिया गांधी यांनी चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या चर्चांना आता नाना पटोले यांनी पूर्णविराम दिला आहे.

सुशील कुमार शिंदे आणि मुकुल वासनिक सोनिया गांधी यांच्या अत्यंत जवळचे आहेत. तर नाना पटोले हे राहुल गांधी यांचे विश्वासू आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या नावाची चर्चा असल्याचं समोर येत होतं. एकीकडे राहुल गांधींवर नाराजी आणि काँग्रेसच्या बदलत्या धोरणांनंतर गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिला. काँग्रेसमधील अंतर्गत वादही समोर येत असताना आता ही मोठी चर्चा सुरू झाली. या दरम्यान महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या नावांची चर्चा आहे. त्यात नाना पटोले यांचं नावही आघाडीवर आहे. मात्र नाना पटोले यांनी स्वतःच आता या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडसाठी माझ्या नावाची चर्चा झाली आहे, ह्या फक्त अफवा आहेत. राहुल गांधी यांनीच अध्यक्ष व्हावं असं आमची इच्छा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. खासदार राहुल गांधी यांनींच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावं अशी 99 टक्के कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

यावेळी नाना पटोले यांनी सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले, की भाजप सरकारने महागाईचा कळस गाठला आहे. सर्वात महागडं राज्य महाराष्ट्र आहे. भाजप आपलं कर्ज फेडण्यासाठी सामान्य नागरिकांकडून वसूली करत आहे. यासोबतच त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही टीका केली. राज्यातील कृषिमंत्री शेतकरी नाहीत, म्हणून शेतकऱ्याची वेदना जाणून घेण्यासाठी ते शेतकऱ्यांकडे जात आहेत, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *