महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ सप्टेंबर । देशात आता सणासुदीला सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळेच आता अनेकजण सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत. पण, त्यांच्या मनात दराबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
आता दिवाळी आणि धनत्रयोदशीपर्यंत सोन्याच्या भावात घसरण होणार की वाढणार हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. गेल्या वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 56,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 50,729 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. अशाप्रकारे गेल्या धनत्रयोदशीच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत कमालीची घट झाली आहे.
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, ओरिगो ई मंडीचे कमोडिटी रिसर्चचे असिस्टंट जनरल मॅनेजर तरुण तत्सांगी म्हणतात, की सराफा बाजारात सोन्याची किंमत 46,000 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. याचे कारण देताना तरुण सांगतात की, सध्या जागतिक आणि देशांतर्गत बाजारात असा कोणताही घटक दिसत नाही, जो सोन्याच्या किमतीला आधार देईल. यापूर्वी रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे सोन्याचे भाव वाढले होते, मात्र आता या तणावाचा परिणामही दूर झाला आहे.
युरोप आणि अमेरिकेत मंदी येण्याची शक्यता असल्याचे तरुण सांगतात. पण मंदी असली तरी सोन्याच्या किमतीवर त्याचा परिणाम होणार नाही. ते म्हणाले की, 2008 मध्ये आलेल्या मंदीचा सामना करण्यासाठी बहुतांश देश तयार नव्हते. त्यामुळे त्याचा अधिक परिणाम झाला. परंतु यावेळी बहुतेक देशांनी मंदीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे.
ट्रेडबुल्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी करन्सी एक्सपर्ट भाविक पटेल म्हणतात की, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने चार आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाल्यामुळे हे घडले आहे. कॉमेक्सवरही सोने सहा आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे. यंदा सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता फारच कमी आहे. अमेरिकन डॉलर निर्देशांक मजबूत झाल्यामुळे आणि रोखे उत्पन्नात वाढ झाल्यामुळे सोन्यातील गुंतवणुकीत घट झाली आहे. हा ट्रेंड पुढेही चालू राहू शकतो.