महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ सप्टेंबर । येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजप शिंदे सेनेसोबत युती करणार आहे. लोकसभा निवडणुकीत 45 पेक्षा जास्त आणि विधानसभा निवडणुकीत युतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळवू, असा निर्धार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
बावनकुळे म्हणाले की, पंकजा मुंडे हे ज्येष्ठ नेतृत्व आहे. त्यांच्याकडे केंद्रीय जबाबदारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याकडे काही जबाबदारी नसेल. तसेच बारामतीची जागा 2024 मध्ये भाजपच्या ताब्यात असेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
# आम्ही महाराष्ट्रातील सर्व लोकसभा जागांवर सक्षम बूथ मोहीम राबवत आहोत. एका बूथवर 30 कार्यकर्ता आणि प्रत्येक मतदार यादीच्या पेजवर एक कार्यकर्ता तैनात करण्याच्या योजनेवर आम्ही काम सुरू केले आहे. आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर 50 युवा वारियर्स म्हणजेच 15 ते 25 वयोगटातील युवा कार्यकर्ते तयार करत आहोत. संघटनेच्या माध्यमातून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याण योजना, केंद्र सरकारच्या सर्व योजना, फडणवीस-शिंदे सरकारने महाराष्ट्रातील गरजू लोकांसाठी तयार केलेल्या योजना पात्र लोकांपर्यंत नेण्याचा नियोजन करत आहोत. अशा प्रकारे एकीकडे संघटना मजबूत करायची आणि दुसरीकडे गरीब कल्याणाच्या योजना राबवायची अशी रणनीती आम्ही तयार केली आहे. अशाप्रकारे सत्ता आणि संघटना या दोन्ही गोष्टी एकत्र करून आपण पुढे जात आहोत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला 45 पेक्षा जास्त जागा आणि विधानसभा निवडणुकीत युतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील याची मला खात्री आहे. राहिला प्रश्न टॉप पाच मतदारसंघांचा, तर मी स्पष्ट करू इच्छितो, की आम्ही सर्व 48 जागा पूर्ण ताकदीने लढवू आणि 45 पेक्षा जास्त जागा जिंकू.
# बारामती लोकसभा मतदारसंघात काही वेगळेच दाखवले जात आहे. भाजपला ही जागा जिंकणे खूप सोपे आहे. आतापर्यंतच्या इतिहासात बारामतीत भाजपने चांगलीच लढत दिली आहे. मात्र, आता 2024 मध्ये बारामतीची जागा भाजपच्या ताब्यात असेल.