दसरा मेळाव्यात कोणाची तोफ धडाडणार ? महाराष्ट्राच्या राजकारणातील या आहेत काही शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ सप्टेंबर । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा चर्चेला कारण ठरला आहे. खरंतर दसरा अजून लांब आहे. त्यामुळे मेळावा देखील तेव्हाच होणार आहे परंतु सध्याच्या घडामोडी पाहता दसरा मेळावा नेमका कुणाचा होणार किंवा छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर कोणाची तोफ धडाडणार? याबाबत या शक्यता आहेत.

दसरा मेळाव्याबद्दल पहिली शक्यता म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: नेहमीप्रमाणे भाषण करतील. त्यांच्या बाजूने दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेला परवानगीसाठी विनंती देखील करण्यात आली आहे. पण शिवसेनेची दसरा मेळावासाठीची ही विनंती अद्याप मान्य करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे शिंदे गटाकडूनदेखील दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागणारं पत्र पाठवण्यात आलं आहे. शिंदे गटाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आपण खरे वारसदार आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच दसरा मेळावा आयोजित होईल, असा दावा करण्यात आला आहे. पण दरवर्षीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरेंना परवानगी मिळाली तर ते शिवाजी पार्कच्या मैदानावर दसरा मेळावा भरवतील आणि भाषण करतील. शिवाजी पार्क मैदानावर समजा परवानगी मिळाली नाही तरी कोणत्यातरी सभागृहात किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनदेखील उद्धव ठाकरे दसऱ्याच्या दिवशी संबोधित करु शकतात. विशेष म्हणजे त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वाधिक राहील.

दुसरी शक्यता म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाला कदाचित शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळू शकते. कारण ते राज्यात सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांना कदाचित सभेसाठी परवानगी मिळू शकते. विशेष म्हणजे दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी स्वत: मुंबई महापालिकेला परवानगीसाठीचं पत्र पाठवलं आहे. त्यामुळे त्यांना कदाचित परवानगी मिळू शकते. त्यांना परवानगी मिळाली तर एकनाथ शिंदे गट मोठ्या थाटात दसरा मेळावा भरु शकतो.

शिंदे गट आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक सध्या वाढताना दिसत आहे. याशिवाय भाजपसोबतही मनसेचे संबंध सुधारले आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काहीतरी वेगळं राजकीय समीकरण बघायला मिळेल, अशी चर्चा रंगली आहे. शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबतची याचिका शिवसेनेने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. या याचिकेचा शिंदे गटाच्या विरोधात निकाल लागला तर त्या आमदारांना मनसे किंवा भाजप पक्षात सहभागी होण्याचा पर्याय असेल. या सर्व घडामोडी पाहता शिंदे गटाने दसरा मेळावा आयोजित केला तर या मेळाव्याला राज ठाकरेंनादेखील आमंत्रण दिलं जावू शकतं आणि या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *