महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ६ सप्टेंबर । ‘‘भाजप आणि जनतेला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये भुईसपाट करा. धोका देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे’’, अशी आक्रमक भूमिका घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल़े एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती करून भाजप आगामी निवडणुका लढवणार असून, मुंबईसह महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व आणि सत्ता राहील, यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश शहा यांनी दिल़े
दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या शहा यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या मुंबईतील खासदार-आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वानी सज्ज राहून, भाजप-शिंदे गटाच्या विजयासाठी आणि भाजपच्या वर्चस्वासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले.
‘‘राजकारणात सारे काही सोसले, तरी दगाबाजी सहन करू नका. जे दगा देतात, त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतील राजकारणात भाजपचे वर्चस्व दाखविण्याची आणि उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे’’, असे शहा म्हणाले.