महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ६ सप्टेंबर । Asia Cup 2022 Ind vs Sl 2022 : आशिया कप स्पर्धेत बाद फेरी नसली तरीही साखळी स्पर्धा आणि सुपर फोर सामन्यात फरक नक्कीच आहे. भारतीय संघाला पाकिस्तानने पराभूत केले आणि एका पराभवाने भारतीय संघावरचे दडपण वाढले आहे. कारण साधे आहे, आव्हान कायम ठेवायचे असेल तर उद्या होणाऱ्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवणे आवश्यकच आहे.
सुपर फोर फेरीत सगळे एकमेकांशी खेळणार आहेत. पाकिस्तानने भारताला हरवून ११ तारखेला रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याच्या दिशेने उडी मारली आहे. भारतीय संघाला श्रीलंका आणि अफगाणिस्तानला पराभूत करायचे आव्हान आहे. यात वेगळे आणि अशक्य काहीच नाही. फक्त पाकिस्तानसमोर खेळताना केलेल्या चुका टाळणे अनिवार्य होणार आहे. आशिया कप स्पर्धेत श्रीलंकन संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली.
अफगाणिस्तानने त्यांना मोठ्या फरकाने हरवले. दुसऱ्या निर्णायक सामन्यात लंकन खेळाडूंनी खेळाचा स्तर उंचावला. भारताचे उलटे झाले. पहिल्या सामन्यात मस्त लय पकडली होती, जी रविवारच्या सामन्यात हातून निसटली. भारतीय फलंदाजीच्या विचारात बदल झाला, जो फायद्याचा ठरला. नव्या चेंडूवर आक्रमण करायचे धोरण कामी आले. दुर्दैवाने गोलंदाजांनी नको त्यावेळी कच खाल्ली. क्षेत्ररक्षणात अटीतटीच्या क्षणी अक्षम्य चुका झाल्या. ज्याची शिक्षा भोगावी लागली.
पाकविरुद्ध १८१ धावांचे रक्षण करताना मुळात गोलंदाजांचा स्वैर मारा कारणीभूत ठरला असला तरी क्षेत्ररक्षणातील ढिलाईसुद्धा मुळावर आली होती. साखळीतील दोन सामन्यांत श्रेत्ररक्षणातील चुका झाकून गेल्या होत्या. आता मात्र प्रत्येक सामना महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येक झेल पकडावाच लागणार आहे.
मंगळवारच्या सामन्यात त्या सर्व चुका टाळणे गरजेचे आहे. फलंदाजी करताना धावांचा टप्पा १८०च्या पार कमीतकमी न्यावा लागेल आणि त्यासोबत २० षटके टिच्चून मारा करावा लागेल. युझवेन्द्र चहलला दोन सामन्यांत ठसा उमटवता आलेला नाही. भारतीय संघ `ऑल इज वेल` गाणे गात असले तरी श्रीलंकेसमोर खेळताना कुठेही चूक होणार नाही आणि संपूर्ण सामन्यात परिपूर्ण खेळ करून वर्चस्व गाजवावे लागेल हे रोहित शर्मा जाणून आहे.
अंतिम संघ यातून निवडणार
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक / रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल/दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान / रवी बिश्नोई, अर्षदीप सिंग आणि युझवेंद्र चहल
श्रीलंका ः पाथूम निसांका, कुशल मेंडिस, चरिथ असलांका, धनुश्का गुणतिलका, भानुका राजपक्षा, दासून शनाका, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेष तिक्शाना, असिथा फर्नांडो, दिलशान मधुशनाका.