महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ६ सप्टेंबर । मुंबईनंतर आता भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बारामतीकडे आपला मोर्चा वळवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याने आज ‘मिशन बारामती’ची सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे शरद पवार ज्या कनेरी गावातून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करतात तेथील हनुमान मंदिरातून भाजप आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. त्यानंतर ते काटेवाडीत कार्यकर्त्यांशी संवाद, सभा, मार्गदर्शन असा दिवसभर त्यांचा कार्यक्रम असणार आहे.
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, विरोधकांच्या बालेकिल्ल्यातून भाजपने आपल्या मिशनची सुरुवात केली आहे. त्यात शरद पवारांचा बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपकडून कसोसीने प्रयत्न केले जात आहेत. भाजपने मिशन बारामतीची सुरुवात केली असून, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण देखील तीन दिवस बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी आज चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती दौऱ्यावर आहेत.
भाजपने कंबर कसली
कनेरीच्या हनुमान मंदिरात नारळ फोडून आज दौऱ्याची सुरुवात होणार आहे. 1967 साली शरद पवारांनी याच मंदिरातून नारळ फोडून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांच्या विजयाचा सिलसिला सुरू झाला आहे. तेव्हापासून अखंडपणे पवार कुटुंबियांचा विजय होताना पाहायला मिळत आहे. मात्र आता तो विजय खंडीत करण्यासाठी भाजपकडून कसोसीने प्रयत्न सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवरच ही भाजपची ‘मिशन बारामती’ मोहिम आहे.
मिशन 16 मतदारसंघ
अनेक नेते या मिशनसाठी बारामतीत दाखल झाले असून, त्यात गोपीचंद पडळकर देखील तयारीसाठी सकाळपासून गुंतले आहेत. ते म्हणाले की, “हा फक्त बारामतीचा विषय नाही, इतर 16 मतदारसंघात आम्ही काम करत आहोत. त्यात बारामती, शिरूर, कोल्हापूर आणि हातकनंगलेचा समावेश आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्राकडून एक प्रभारी देखील निवडण्यात आला असून, निर्मला सीतारमण यांच्याकडे बारामतीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर येत्या 22, 23 आणि 24 सप्टेंबरला सीतारमण बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याच्या पूर्व तयारीसाठी चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत येत आहे.”
बारामती आता आमचीच
पुढे पडळकर म्हणाले की, “2014 लोकसभा निवडणुकीत बारामती जिंकल्यात जमा होती. मात्र, थोड्यामुळे आपण ती हरलोय. आता मात्र निश्चितपणे सर्वांना सोबत घेऊन आम्ही बारामती जिंकणार आणि भाजपचा झेंडा फडकणार”