महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ सप्टेंबर । “दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचा आहे, तिथे मी सविस्तर बोलेन. आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाचा मास्क असायचा, त्यामुळे बोलताना जपून बोलावे लागायचे. आता तसे नाही,’ असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट व भाजपला दिला. मेळाव्यासाठी शिवतीर्थ आम्हाला द्यावे, असा अर्ज शिंदे गटाने मुंबई महापालिकेकडे केला आहे. त्यामुळे दसरा मेळावा सेनेचा की शिंदे गटाचा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उद्धव ठाकरेंनी मंगळवारी (६ सप्टेंबर) मातोश्रीवर शिवसेनेच्या शाखाप्रमुखांची बैठक बोलावली. मुंबईतील सर्व विभागप्रमुख आणि विभाग महिला संघटक या बैठकीला उपस्थित होते. आगामी मुंबई मनपा निवडणुकांच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
उद्धव म्हणाले की, ‘काल ते जमीन दाखवायची म्हणाले. थोडक्यात हा काळ संघर्षाचा आहे. ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. निष्ठा ही कितीही बोली लावली तरी विकली जाऊ शकत नाही. पसाराभर नासलेले लोक असल्यापेक्षा मूठभर निष्ठावान असतील तर मैदान जिंकू शकतो. ही काही माझी खासगी मालमत्ता नाही,’ असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘मुख्यमंत्रिपद हवे असते तर मी क्षणभरात सोडले असते. माझ्याकडे तेव्हाही ३०-४० आमदार होते, तेव्हा त्यांना डांबून ठेवता आले असते.
माझीही ममता बॅनर्जींसोबत ओळख होती, त्यांना तिकडे घेऊन गेलो असतो. किमान कालीमातेच्या मंदिरात नेले असते. राजस्थानात त्यांना नेता आले असते. पण तो माझा स्वभाव नाही. त्यामुळे सगळ्यांना सांगितले, दरवाजा उघडा आहे, राहायचे असेल तर निष्ठेने राहा, नसेल तर तिकडे जा. आता माझ्यासोबत कडवट शिवसैनिक आहेत,’ असे उद्धव म्हणाले.
बाप्पा सर्वांना सुबुद्धी देवो
अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे अलर्ट झाले आहेत. शहा यांच्या दौऱ्याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘मुंबईत काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले. काल गणपतीच्या मंडपातदेखील राजकारण दिसले. गणपती जिथे आहे, तिथे काही बोलू नये. पण ते बोलून गेले. गणपती हा बुद्धीचा दाता आहे. त्याने सर्वांना सुबुद्धी द्यावी,’ असा टोला उद्धव यांनी हाणला.