पत्राचाळ प्रकरण : शरद पवार यांचीही चौकशी व्हावी यावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “…त्यानंतर मी नक्की…”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ सप्टेंबर । शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे ज्या पात्राचाळ प्रकरणी सध्या सक्तवसुली संचलनालयाच्या ताब्यात आहेत त्याच प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मंगळवारी केली. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे या मागणीला पाठींबा दिला. असं असतानाच मंगळवारी रात्री जळगावच्या दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात भाष्य केलं.

जवळ जवळ १ हजार ३९ कोटींच्या पत्राचाळ प्रकरणावरुन अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं असून यामध्ये त्यांनी शरद पवार यांचीही चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना व्हाय बी सेंटरला म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत संजय राऊतांच्या उपस्थितीत पत्राचाळसंदर्भात बैठका झाल्या. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखही उपस्थित असल्याचा संदर्भ ही दिला जात आहे. याच प्रकरणाबद्दल जळगाव दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिंदेंनी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं.

“पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांचं नाव समोर आलेलं आहे. त्यांच्या चौकशीची देखील आता भाजपाकडून मागणी केली जात आहे. तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे?” असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी, “नाही, त्याची मी माहिती घेतो. मला माहिती घेऊ द्या. त्यानंतर मी नक्की बोलेन,” असं उत्तर दिलं. त्यानंतर पत्रकारांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखही या बैठकीला उपस्थित असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारला. “तत्कालीन मुख्यमंत्री आणि शरद पवार दोघांचं नाव आहे,” असं पत्रकाराने म्हटलं. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी, “नाही, म्हणून मी त्या बाबतीत माहिती घेऊन नक्कीच आपण सविस्तर बोलू,” असं उत्तर दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *