महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि . २२ सप्टेंबर । IND vs AUS 2nd T20 Nagpur : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना नागपुरात होणार आहे. दोन्ही संघांमधील सामना शुक्रवारी विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू नागपुरात पोहोचले आहेत. मोहाली ते नागपूर या प्रवासाचा एक छोटा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जामठा स्टेडियमवर कसोटी असो वा वनडे सामना प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध भारताचे रेकॉर्ड नेहमीच चांगले राहिलेले आहे; मात्र टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी संमिश्र ठरली आहे. या मैदानावर झालेल्या चारपैकी दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळविला असून, दोन लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
२००९ पासून आतापर्यंत जामठा स्टेडियमवर विविध संघांमध्ये एकूण १२ टी-२० सामने खेळल्या गेले. भारतीय संघ चार सामने खेळला. यातील श्रीलंका (डिसेंबर २००९) आणि न्यूझीलंडविरुद्धच्या (मार्च २०१६) पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये यजमान भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने बाजी मारली. जानेवारी २०१७ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा पाच धावांनी व नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या शेवटच्या लढतीत बांगलादेशचा ३० धावांनी पराभव केला.
उल्लेखनीय म्हणजे या मैदानावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत एकही टी-२० सामना खेळलेला नाही. याउलट कसोटी व वनडेमध्ये मात्र भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.