महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि . २२ सप्टेंबर । दोषी किंवा निर्दोष ठरवण्यासाठी न्यायालये आहेत. न्यायालयाला न्यायालयाचे काम करू द्या. कुणाला पकडायचे असेल त्याला ‘ईडी’ने पकडावे; पण दोन महिन्यांत त्याचा एफआयआर कोर्टात गेला पाहिजे. कोणत्याही सुनावणीशिवाय किंवा गुन्हा सिद्ध न होता एखाद्याला चार-पाच महिने तुरुंगात ठेवणे योग्य नाही. याला घटनाही मान्यता देत नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सुनावले. ते सांगली दौऱयावर होते. वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी दोन महिन्यांपूर्वी अहवाल सादर केला होता. त्यात,‘अंदाधुंदपणे पद्धतीने हे सरकार सरकारी मालमत्ता विकत आहे. हे देशाच्या हिताचे नाही,’ असे म्हटले होते. असाच आरोप मी सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला होता. त्यावर रिझर्व्ह बँकेने आता शिक्कामोर्तबच केले आहे. सध्या देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. ईडी, सीबीआय यांची भीती दाखवून देश चालवणाऱया पंतप्रधान मोदी यांनी आता चित्ता आणून त्याची भीती दाखवण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला. राज्यात पावसाने शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. सरकारने विमा पंपन्यांना नुकसानीची 100 टक्के भरपाई देण्यास भाग पाडावे, अशी मागणीही त्यांनी केली.