Raj Thackeray: राज ठाकरेंनी या मुद्द्याकडे वेधलं लक्ष ; सरकारकडे केली महत्वाची मागणी अन् कार्यकर्त्यांना दिले आदेश !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि . २३ सप्टेंबर । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात लहान मुलांच्या वेठबिगारीच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे. राज ठाकरेंनी आज सोशल मीडियात एक पोस्ट लिहीली असून यात राज्यात नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार वाढत असल्यांचं म्हटलं आहे. तसंच यावर कारवाईची मागणी राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे.

“गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत”, असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्र सैनिकांनाही वेळ पडली तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना आपल्या पद्धतीने धडा शिकवण्याचे रोखठोक आदेश दिले आहेत.

https://www.facebook.com/RajThackeray/posts/637905131029727

राज ठाकरेंची नेमकी पोस्ट काय?
गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत.

नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही.

राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं.

पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांची तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील. ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *