Tata Tiago EV Launch : भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात टाटांचा दबदबा ! अवघ्या ८.४९ लाख रुपयांत Tata Tiago EV लॉन्च

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ सप्टेंबर । टाटा मोटर्सनं फेस्टीव्हल सीझनमध्ये सर्व प्रतिस्पर्ध्यांना धक्का देत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. Tata Tiago EV कार आज लॉन्च करण्यात आली आहे. भारतात इलेक्ट्रिक कार क्षेत्रात याआधीपासूनच टाटा कंपनीचा दबदबा राहिलेला आहे. यातच आता कंपनीनं देशातील पहिली हॅचबॅक इलेक्ट्रीक कार लॉन्च करत इलेक्ट्रीक क्षेत्रातील आपली पकड आणखी मजबूत केली आहे.

टाटाची टियागो इव्ही कारची ग्राहकांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड उत्सुकता होती. अखेर आज कंपनीनं कार लॉन्च करत इलेक्ट्रिक वाहन बाजारात सर्वांना धक्का दिला आहे. कंपनीनं अत्यंत किफायशीर किमतीत कार लॉन्च केली आहे.

कंपनीनं नव्या टियागो ईव्ही कारमध्ये अनेक फिचर्स ऑफर केले आहेत. यात 24kWh चा बॅटरी पॅक दिला आहे. जो एकदा फूल चार्ज झाला की कार ३१५ किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. तसंच 19.2kWh बॅटरीचाही पर्याय कंपनीनं उपलब्ध करुन दिला आहे. यात कार फूल चार्ज झाली की २५० किमीची रेंज देण्याची क्षमता आहे. कंपनीनं कारमध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि फ्रंट-व्हील ड्राइव्ह सेटअप दिला आहे. जे आपण याआधीच्या टिगोर इव्हीमध्येही पाहिले आहेत.

टियागो ईव्ही कार 74.7PS पावर आणि 170Nm टॉर्ग जनरेट करण्यास सक्षम आहे. याशिवाय कंपनीनं टियागो ईव्हीमध्ये क्रूझ कंट्रोल, मल्टीपल रि-जेन मोड सारखे अत्याधुनिक फिचर्स ऑफर केले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार कारची बॅटरी ५७ मिनिटांत ८० टक्के चार्ज होते. तसंच ही कार अवघ्या ५.७ सेकंदात ६० किमी प्रतितास वेग प्राप्त करण्यास सक्षम आहे.

टाटा टियागो इव्ही येणार अशी जेव्हा बातमी समोर आली होती. तेव्हाच ही कार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. टियागो ईव्हीची किंमत जवळपास १० लाख रुपये असू शकते असा अंदाज ऑटो तज्ज्ञांनी वर्तवला होता. पण कंपनीनं सर्वांना धक्का देत कार अवघ्या ८.४९ लाख रुपये सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे. तर या कारच्या टॉप व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत ११.७९ लाख इतकी आहे.

आपल्या जुन्या ग्राहकांसाठी कंपनीनं २ हजार ईव्ही कार आधीच आरक्षित ठेवल्या आहेत. टाटा टियागोचं बुकिंग १० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर कारची डिलिव्हरी जानेवारी २०२३ पासून सुरू होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. टाटा टिगोर आजवरची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार होती. या कारची एक्स-शो रुम किंमत १२.४९ लाख इतकी होती. पण आता टाटा टियागो इव्ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरली आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांबाबत बोलायचं झालं तर कोणतीही कंपनीनं अद्याप २० लाखांपेक्षा कमी किमतीत इलेक्ट्रिक कार लॉन्च केलेली नाही.

टाटा मोटर्सकडून याआधीच एसयूव्ही आणि सेडान कॅटेगरीमध्ये इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. एसयूव्ही सेगमेंटमधील टाटा नेक्सॉन ईव्ही कारला ग्राहकांनी चांगली पसंती देखील दिली आहे. टाटा नेक्सॉन इव्हीच्या रुपात टाटा मोटर्सनं इलेक्ट्रिक बाजारात दबदबा निर्माण केला आहे. तसंच कंपनीनं नुकतंच सेडान कॅटेगरीमध्ये टाटा टिगोर ईव्ही लॉन्च केली होती. आता हॅचबॅक प्रकारातही कंपनीनं इलेक्ट्रीक कारचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करुन दिला आहे. कारची किंमत पाहता टाटा टियागो इव्ही या क्षेत्रात धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे.

टाटा मोटर्सनं २०२६ सालापर्यंत १० इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. टाटा नेक्सॉन इव्ही, टाटा टिगोर आणि आता टियागो इव्ही अशा तीन कार लॉन्च झाल्या आहेत. म्हणजेच आता येत्या तीन ते चार वर्षात टाटा कंपनीकडून आणखी ७ इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या जाणार आहेत. देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टाटा मोटर्सनं सर्वात आधी टियागो ईव्ही कारला एक कॉन्सेप्ट कार म्हणून ब्रिटनमध्ये एका शोमध्ये सादर केली होती. त्यानंतर २०१८ साली झालेल्या ऑटो एक्सपोमध्येही या कारची झलक पाहायला मिळाली होती.

टाटा मोटर्सला इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये भारतात आतापर्यंत दमदार प्रतिसाद मइळाला आहे. कंपनीची टाटा नेक्सॉन ईव्ही कार देशातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार ठरली आहे. टाटा मोटर्सचा भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात तब्बल ८८ टक्के इतका वाटा आहे. कंपनीनं ऑगस्ट २०२२ मध्ये नेक्सॉन प्राइम, नेक्सॉन इव्ही मॅक्स आणि टिगोर ईव्ही अशा मिळून एकूण ३,८४५ इलेक्ट्रिक कारची विक्री केली होती. याआधी कंपनीनं जुलै २०२२ मध्ये ४,०२२ इलेक्ट्रिक कार विकल्या होत्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *