महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – मुंबई आणि पुण्यासह राज्यातील रेड झोन असलेल्या परिसरांमधील लॉकडाऊन इतक्यात उठवणे हितावह नसल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यामुळे ३ मे नंतरही राज्यातील या भागांमध्ये लॉकडाऊन सुरुच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ३ मे नंतर महाराष्ट्रातील ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील निर्बंध शिथील करण्यात येतील, असे सांगितले. मात्र, याठिकाणी पुन्हा गर्दी होत असेल तर लॉकडाऊनचे निर्बंध पुन्हा लादण्यात येतील, असेही त्यांनी बजावले.
मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर आणि औरंगाबदचा परिसर हा रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे याठिकाणी दैनंदिन व्यवहार सुरु झाले आणि कोरोनाचा विस्फोट झाला तर आतापर्यंत केलेली तपश्चर्या फुकट जाईल. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या आणि व्यवसाय ठप्प झाले आहेत. मात्र, जनता हीच खरी देशाची संपत्ती असते. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव संपल्यानंतर आपण राज्याचा गाडा या चिखलातून बाहेर काढू, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.