Congress : पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेस हायकमांडला धोक्याचा इशारा ; भाजपला ‘हा’ संदेश जाता कामा नये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२ ऑक्टोबर । काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यात थेट लढत होत आहे. याच दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी काँग्रेस हायकमांडला (Congress High Command) इशारा दिलाय.

विधानसभा निवडणुका (Assembly Election) होऊ घातलेल्या राज्यांमधूनही काँग्रेसची भारत जोडो यात्रा जायला हवी होती, आपण ही निवडणूक सोडलेय, असा संदेश भाजपला (BJP) जाता कामा नये, असा सल्ला वजा इशारा चव्हाण यांनी काँग्रेस हायकमांडला दिला. काँग्रेस अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं भाष्य महत्त्वाचं मानलं जात आहे. काँग्रेसमध्ये इतक्या वर्षांनी निवडणूक होणं ही ऐतिहासिक बाब आहे. त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं, असा आमचा आग्रह होता असंही ते म्हणालेत.

काँग्रेस अध्यक्षाच्या कामात बाहेरुन म्हणजेच, गांधी कुटुंबाकडून ढवळाढवळ होते का, हे वेळ आल्यावरच समजेल. नव्या अध्यक्षांना काम करु दिलं जाईल, अशी आशा आहे. मात्र तसं झालं नाही, तर पुन्हा त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जातील. परंतु हस्तक्षेप होईलच, असं गृहित धरणं योग्य नाही. आपण चांगला विचार करुया, असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. राहुल गांधी, काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे नेते इतके दिवस लोकांसमोर येणार आहेत. पण, ही भारत जोडो यात्रा काही ठराविक राज्यांतूनच जाणार आहे. विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यातूनही ती जायला हवी होती. कारण, आपण ही निवडणूक सोडलेय, असा संदेश भाजला जाता कामा नये, असा धोक्याचा इशारा चव्हाण यांनी दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *