नव्याने शिवसेना नेतेपदाची धुरा दिलेल्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव यांनी गाजवली ठाकरेंची सभा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ ऑक्टोबर । शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी शिवसैनिकांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला, तो शिवसेनेत नव्याने आलेल्या सुषमा अंधारे यांना आणि नव्याने शिवसेना नेतेपदाची धुरा दिलेल्या भास्कर जाधव यांना.

सुषमा अंधारे यांनी आपल्या भषाणातून नारायण राणे, रामदास कदम, किरीट सोमय्या आदी नेत्यांवर आपल्या आक्रमक शैलीत हल्ला चढवला. सुषमा अंधारे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर टीका करणाऱ्यांनी हिंदू धर्मातील कोणत्या ग्रंथात दुसऱ्या धर्माचा द्वेष करावा हे सांगितले आहे हे सांगावे, असे आव्हान आपण शिंदे गटाला देत आहोत. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अनेक मुस्लिम आज शिवसेनेच्या भूमिकेच्या जवळ येत असल्यामुळेच अनेकांना त्रास होत आहे, असेही अंधारे म्हणाल्या.

‘उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत गेल्यामुळे नारायण राणे त्यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, याच सोनिया गांधींच्या पायावर दहा वर्षे लोळण घेत आमदार, खासदार, मंत्रिपदे मिळवली त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी, हे हास्यास्पद आहे,’ अशा शब्दांत अंधारे यांनी नारायण राणे यांच्याकडून होत असलेल्या टीकेचा समाचार घेतला. किरण पावसकर यांच्यावरही जोरदार टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, इतरांचे जाऊद्या पण किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करावी आणि तीही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले म्हणून? हे किरण पावसकर अजित पवार यांनी विधान परिषेदेचे चॉकलेट दिल्यामुळे कालपर्यंत राष्ट्रवादीतच होते. आज ते उद्धव ठाकरेंना शिवसेनेबद्दल शिकवत आहेत, याला काय म्हणावे?

सुषमा अंधारे यांनी भाषणावेळी शिवसैनिकांना उद्देशून गळ्यातील भगवे उपरणे फिरवायला सांगितल्यावर संपूर्ण शिवाजी पार्कातील शिवसैनिकांनी ही उपरणी फिरवायला सुरुवात केली.

भास्कर जाधव यांनीही राणे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘राणे यांना बाळासाहेबांनी मोठे केले, तरी अजूनही हे शिपाईच राहिले,’ असे जाधव म्हणाले. तसेच ज्या धनुष्यबाणावर निवडून आले, तेच चिन्ह गोठवण्यासाठी शिंदे गट प्रयत्न करतो आहे हे दुर्दैवी आहे, असेही जाधव म्हणाले. ‘काँग्रेससोबत गेलो ही टीका करणाऱ्या शिंदे गटाच्या लोकांना आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे, की काँग्रेसनेही मतभेद असताना कधीही दसरा मेळाव्याला शिवतीर्थ नाकारण्याचे पाप केले नव्हते. मात्र, हे पाप शिंदे गटाच्या लोकांनी केले हे सच्चा शिवसैनिक कधीही विसरणार नाही,’ असे जाधव म्हणाले.

तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल केला. ‘मुंबई महापालिकेची चौकशी करण्याच्या धमक्या फडणवीस देत आहेत. पण नागपूर महापालिकेत पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट ओसीडब्ल्यू नावाच्या एका भाजपशी संबंधित व्यक्तीच्या कंपनीला देण्यात आले. या कंपनीने ८० कोटींची थकबाकी असल्याचे सांगत काम थांबवले असून, त्यांना हे पैसे देण्याची लगबग सरकारकडून सुरू आहे,’ असा आरोप देसाई यांनी केला. नागपूरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करण्यासाठी कंत्राटी बस घेतल्या असून, त्यालाही १०० कोटी देण्याचे ठरत असून, यात कुणाचा फायदा होणार आहे, असा प्रश्न देसाई यांनी फडणवीस यांच्या रोखाने दसरा मेळाव्यात उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *