मातोश्रीवर बोलवून ठाकरे म्हणाले, … संदीप देशपांडेंनी इतिहास काढला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑक्टोबर । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पक्षाला धोका दिल्याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना देशपांडे यांनी २०१७ मधील युतीच्या प्रस्तावाचा दाखला दिला. तसंच खंजीर खुपसण्याची उद्धव ठाकरेंची जुनी सवय आहे, असा टोलाही देशपांडे यांनी लगावला.

२०१७ साली मला आणि संतोष धुरीला उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवून घेतलं होतं. आपल्याला एकत्र निवडणूक लढवायची आहे, असं सांगून आमच्याशी बोलणी केली. आम्हाला हेही सांगितलं, की आम्ही भाजपशी लग्न मोडतोय आपण नवीन लग्न करु, त्यानंतर आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम स्वतः उद्धव ठाकरे यांनी केलंय. त्यामुळे खंजीर खुपसायची सवय यांची जुनी एवढं नक्की, असं संदीप देशपांडे म्हणाले.

शिवतीर्थावर विचारांचं सोनं लुटायला मिळेल असं वाटलं होतं. पण नळावरची भांडणं आणि उणीदुणी पाहायला मिळाली. माझी बालदी पुढे का सरकवली, तुझी बालदी मागे का नेली, अशा लेव्हलची भांडणं दसरा मेळाव्यात होती. ज्या पद्धतीने मुद्दे मांडले, एकमेकांना शिव्या घालण्यासाठी मेळाव्याचा उपयोग करुन घेतला. नवीन कुठलेच मुद्दे नव्हते. महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. आम्ही तुम्हाला चांगले रस्ते देऊ, खड्ड्यांची समस्या का येते, मुंबईची तुंबई का होते, यावर बोललेच नाहीत. गद्दार, खंजीर, खोके याव्यतिरिक्त काहीच नव्हतं, असा घणाघात संदीप देशपांडे यांनी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढी पाडवा मेळाव्यात दरवर्षी जनतेला नवा विचार दिला जातो. मशिदीवर अनधिकृत भोंगे, टोल नाके यासारखे वेगवेगळे विषय मांडले जातात. रझा अकादमीच्या मोर्चावर यांनी एक शब्द काढला नाही. परप्रांतीय रेल्वेतील नोकऱ्या खाताना राज ठाकरेंनी मोठं आंदोलन केलं, तुम्ही काय केलंत? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला. गेली सात-आठ वर्ष तर भाजप कसा वाईट आहे, हेच ते सांगत होते. आता नवीन टार्गेट ४० आमदार आणि त्यांचेच लोक, असंही देशपांडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *