महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ ऑक्टोबर । शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे दोन्ही गट वापरु शकणार नाहीत. असा ठाकरे आणि शिंदे गटाला अनपेक्षित असणारा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) काल दिला. या निर्णयामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.
आयोगाच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तर या सर्व प्रकरणावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकर म्हणाले, शिवसेना कायदेशीर बाजू मांडण्यात कमी पडल्याने त्यांना मोठा फटका बसला असला तरी अजूनही शिवसेनेच्या हातातून सगळं काही निसटल नाही.
त्यांनी वेळीच कायदेशीर बाबी समजून पावलं उचलली तर पक्ष टिकवण्याची संधी त्यांना असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत. राज्यात एकीकडे शिवसेनेचं नाव आणि चिन्ह दोन्ही गटांना वापरण्याची बंदी निवडणूक आयोगाने घातली असून आता दोन्ही गटाकडून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
तर ठाकरे गटाने आपणाला कोणतं चिन्ह आणि नावं हवं यासाठी आयोगाला पत्र देखील पाठवलं आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेला हवं ते चिन्ह मिळणार की त्यात आणखी काही व्यत्यय येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.