महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑक्टोबर । उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटांचा शिवसेनेवर ताबा मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहे. यातच काही काळासाठी निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटांना त्यांच्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह वाटून दिले आहे. यानुसार सोमवारी ठाकरे गटाला मशाल दिली होती. तर शिंदे गटाकडे चिन्हाचे नवे तीन पर्याय मागितले आहेत. याच दरम्यान सुनिल राऊत यांनी संजय राऊतांचा एक किस्सा सांगितला आहे.
संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत (Shivsena Sunil Raut) यांनी “संजय राऊत शंभर टक्के बाहेर येणार. त्यांनी कितीही अन्याय करू देत… ते बाहेर येतील आणि भाजपाच्या अत्याचाराविरोधात शिवसेनेचा आवाज बुलंद करण्यासाठी ते लवकर बाहेर येतील. राऊतांच्या कानात एकानं सांगितलं, त्या वेळी कॉम्प्रमाइज केलं असतं तर बरं झालं असतं.. त्यावेळी राऊतांनी उत्तर दिलं. मी बाळासाहेबांना वरती जाऊन काय तोंड दाखवलं असतं? गद्दार म्हणून? की निष्ठावंत शिवसैनिक म्हणून? 40 आमदार जे मिंधे लोक गेलेत त्यांनी शिवसेना संपुष्टात आणली, धनुष्यबाण मिटवलं…” असं म्हटलं आहे.
सुनिल राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “एकनाथ शिंदंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपा शिवसेना संपवण्याचं काम करतंय” असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. “संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केलेला नाही. त्यांची काहीच चूक नाही. देशातल्या कुठल्याही वकिलाला विचारा. माझ्याकडून चार्जशीट घेऊन जा… यांच्यावर एफआयआर होऊ शकतो, असं कुणीही म्हणणार नाही. पण जोपर्यंत भाजपाचं राज्य आहे, हे होऊ शकत नाही…” असं म्हटलं आहे. विक्रोळीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.