महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड : . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पाच बालकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर दोन बालकांची अतिजोखमीच्या आजारातून सुटका करण्यात बालरोग विभागाच्या डॉक्टरांच्या पथकाला यश आले आहे. कोरोनाच्या संसर्गाने जगभरात धुमाकूळ घातलेला असताना पिंपरी चिंचवड शहरातील 2 ते 12 वर्षे वयोगटातील सात बालकांनी कोरोनावर मात केली आहे.
आज दोन मे 2020 रोजी यशवंतराव चव्हाण रूग्णालयातून या बालकांना सुखरूप घरी सोडण्यात आले. 16 व 17 एप्रिल रोजी ही सात कोरोनाग्रस्त बालके वायसीएम रूग्णालयातील बालरोग विभागात दाखल झाली होती. या बालकांना वेळोवेळी सर्व उपचार देवून 14 दिवस रूग्णालयात ठेवण्यात आले. यापैकी दोन बालकांवर कोरोनाचे उपचार चालू असताना त्यांच्या प्लेटलेट्सचे प्रमाण 30,000 व 66,000 हजार असे प्रयोगशाळेतील अहवालानुसार झाले होते. सशक्त बालकांमध्ये हे प्रमाण दीड लाखांच्या वर असते. त्यासाठी या बालकांवर उपचार करून सात दिवसात त्यांच्या प्लेटलेट्स (पांढऱ्या पेशी) पूर्ववत करण्यात यश मिळाले.
सर्वांची कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक बालरोग अतिदक्षता विभागात या सर्वांना त्यांच्या मातांसोबत ठेवण्यात आले होते. माता व बालकांच्या 14 दिवसांच्या उपचारानंतर दोन वेळ घशातील द्रवाची तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे आज त्यांना घरी सोडण्यात आले. बालरोग विभागातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना आयुक्त श्रावण हर्डीकर, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व वैद्यकिय अधिक्षक डॉ. अनिकेत लाठी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याने ही कामगीरी करता आली. बालरोग विभाग प्रमुख डॉ. दिपाली अंबिके, डॉ. सुर्यकांत मुंडलोड सर्व निवासी डॉक्टर्स, स्टाफ, नर्स व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे या बालकांना पुनर्जन्म मिळाला आहे.