महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ ऑक्टोबर । उत्तर भारतातील राज्यांत यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता, पण आता ऑक्टोबरमध्ये आलेल्या मुसळधार पावसाने मागील अनेक विक्रम मोडले आहेत. महिन्याच्या सुरुवातीच्या ११ दिवसांत देशात सरासरीपेक्षा ८०% जास्त पाऊस झाला आहे. खासकरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीत या महिन्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ७-८ पट अधिक पाऊस झाला आहे.
हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा पाऊस मंद गतीने होत आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत जिरत आहे. हे रब्बी हंगामासाठी अत्यंत फायद्याचे आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेटचे शास्त्रज्ञ महेश पलावत सांगतात, पुढील दोन दिवसांत उत्तर ते मध्य भारतापर्यंत पश्चिमी वारे वाहतील. यामुळे हवेतील आर्द्रता कमी होत जाईल व सकाळ-सायंकाळचे तापमान ३ ते ५ अंशांपर्यंत कमी होईल. यामुळे हलकी थंडी जाणवू शकते. मात्र, उबदार कपड्यांची गरज डिसेंबरपर्यंत तरी भासणार नाही. देशभरात पावसाच्या परतीची सामान्य तारीख १५ ऑक्टोबर आहे. यंदा मात्र १८ ऑक्टोबरपर्यंत राहील.
पलावत म्हणाले, साधारणत: ला-निना वर्षांमध्ये पाऊस व थंडी जास्त पडते आणि अल-निनो वर्षांत उष्णता व दुष्काळ पडतो. यंदाही ला-निनाचा प्रभाव आहे. ला-निना ३ वर्षांपर्यंत कायम असतो तेव्हा याला ट्रिपल डिप ला-निना म्हणतात. ही एक असामान्य घटना आहे. गेल्या ७० वर्षांत असे फक्त चौथ्यांदा होत आहे. म्हणजेच यंदाही कडाक्याची थंडी पडेल. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ चरण सिंह म्हणाले की, डोंगरांवर हिमवर्षावासाठी सध्या अनुकूल वातावरण नाही. पुढील काही दिवसांत पश्चिमी विक्षोभामुळे हिमवर्षाव होईल. त्यानंतर पारा घसरायला लागेल.
पाऊस मिलिमीटरमध्ये
देशात १ ते ११ ऑक्टोबरपर्यंत ३६.९ मिमी पाऊस अपेक्षित होता. आतापर्यंत ६६.४ मिमी म्हणजेच ८०% अधिक पाऊस झाला आहे.