महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ ऑक्टोबर । पालघरच्या वाडा तालुक्यातील खारीवली बिलावली ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोणा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गावाजवळच्या जंगलात रात्री जादूटोणा केला जात असल्याचं काही तरूणांना समजताच त्यांनी रंगेहात पकडले आहे. त्या ठिकाणी काळी बाहुली, अगरबत्ती, लिंबू, गुलाल, काळा दोरा अशा वस्तू आढळून आल्या आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराला हरवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा तालुक्यात सध्या ग्रामपंचायती सुरू आहेत. तर तालुक्यातील खारीवली-बिलावली या ग्रुप ग्रामपंचायतीच्या आवारातील जंगलात अघोरी प्रकार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आणि गावातील काही तरूणांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये एक स्कुटी, एक चारचाकी वाहन आढळून आल्याने या वस्तूंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तर, २१ शतकातही या महाराष्ट्रात असे अघोरी प्रकार घडत असल्याने खंत व्यक्त केली जात आहे. निवडणुकीत जिंकण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत पण निवडून आल्यानंतर गावाचा विकास कसा करणार असा प्रश्न निर्माण होत आहे.