दिवाळीच्या सुट्टीत गावाला जाताय ; रेल्वेने घेतलाय मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ ऑक्टोबर । दिवाळीच्या सुट्टीत गावी आणि पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवासी-पर्यटकांची संख्या मोठी आहे. सध्या नियमिती गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याने प्रतीक्षायादीत देखील सातत्याने वाढ होत आहे. ही गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य आणि कोकण रेल्वेने संयुक्तपणे (०११८७-८८) लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आज, शनिवार १६ ऑक्टोबरपासून १४ नोव्हेंबरपर्यंत दर रविवारी ही गाडी धावणार आहे. एलटीटी येथून रात्री १०.१५ वाजता रवाना होईल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता पोहोचेल. या गाडीचा परतीचा प्रवास दुपारी १.३० वाजता सुरू होईल.

(०११८५-८६) लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूरू साप्ताहिक विशेष गाडी २१ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. एलटीटी येथून रात्री १०.१५ वाजता सुटणार असून, मंगळुरू येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.०५ वाजता पोहोचेल. या विशेष गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कासह शनिवारपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर आणि संकेतस्थळावर सुरू होणार आहे. गाड्यांचे सविस्तर थांबे आणि माहितीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेच्या अधिकृत समाजमाध्यमांवर भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

पश्चिम रेल्वेने दिवाळी विशेष ३० रेल्वेगाड्यांची घोषणा केलेली आहे. वांद्रे टर्मिनस ते गांधीधाम सुपरफास्ट एक्सप्रेस (८ फेऱ्या), वांद्रे टर्मिनस ते भावनगर विशेष (१० फेऱ्या), वांद्रे टर्मिनस ते भगत की कोठी (४ फेऱ्या) आणि वडोदरा ते हरिद्वार या दरम्यान विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण, वेळ आणि थांबे यांसाठी पश्चिम रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, अशी माहिती पश्चिम रेल्वेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *