महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ ऑक्टोबर । राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी मका, बाजरी, सोयाबीन, ऊस या पिकांसह फळबागा अडचणीत आल्या आहेत.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकण : ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर.
मराठवाडा : औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.
विदर्भ : बुलडाणा, वाशीम, यवतमाळ.
पुण्यात हाहाकार
मुसळधार पावसामुळे पुण्यात हाहाकार उडाला आहे. शिवाजीनगर परिसरात केवळ काही तासांत 104 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे रस्त्यांना नद्यांच स्वरप आले असून अनेक ठिकाणी घरांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान रस्त्यावर उतरले आहेत.
चिमुकलीलाल खांद्यावर घेत तिची पाण्याने वेढलेल्या घरातून सुटका करताना नागरिक.
चिमुकलीलाल खांद्यावर घेत तिची पाण्याने वेढलेल्या घरातून सुटका करताना नागरिक.
मागील 24 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आजही या भागांत काही ठिकाणी जोरदार तर कुठे तुरळक पाऊस पडत आहे.
24 तासांत मान्सूनची आणखी माघार शक्य
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) संपूर्ण बिहार, सिक्कीम, मेघालय, मध्य प्रदेश, आसाम, त्रिपुरा, छत्तीसगड, विदर्भासह महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघार घेतली आहे. परतीस पोषक हवामान असल्याने पुढील 24 तासांत मान्सून विदर्भ, छत्तीसगड, झारखंड व ओडिशाच्या काही भागातून मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे.
पिके धोक्यात
मराठवाड्यासह विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना परतीच्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसत आहे. सध्या बाजरी आणि मका काढणीस तयार झाले असतानाच पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर उभ्या बाजरीला कोंब येण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. उसाच्या पिकात पाणी साचून राहत असल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे.