बुमराहच्या जागी ‘हा’ खेळाडू परफेक्ट ; मास्टर ब्लास्टरने केला खुलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ ऑक्टोबर । भारतीय संघाने सराव सामन्यात विजय मिळवत टी-२० विश्वचषकात शानदार सुरुवात केली आहे. सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय साकारला. मात्र विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. प्रथम, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडला.

यानंतर जखमी दीपक चहरलाही अखेरच्या प्रसंगी बाहेर पडावे लागले. अशा परिस्थितीत बुमराहच्या जागी भारतीय संघाने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा संघात समावेश केला. शमीने पहिल्या सराव सामन्यात आपला फॉर्म दाखवून दिला आहे. त्याने एकाच षटकात ३ बळी घेत भारतासाठी सराव सामना जिंकला.

‘बुमराह संघासोबत नाही, हे मोठे नुकसान’

आता दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरनेही शमीचे कौतुक केले आहे. त्याने शमीचे वर्णन बुमराहचा परफेक्ट रिप्लेसमेंट म्हणून केले आहे. सचिन म्हणाला की, शमीने स्वत:ला सिद्ध केले आहे. बुमराहसाठी तो योग्य पर्याय आहे. मात्र, बुमराहचे संघाबाहेर असणे हे कुठेतरी संघाचे मोठे नुकसान असल्याचेही सचिनने म्हटले आहे.

सचिनने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘बुमराह संघासोबत नाही, हे मोठे नुकसान आहे. आम्हाला स्ट्राईक बॉलरची गरज होती. असा वेगवान आणि तल्लख गोलंदाज, जो फलंदाजांवर हल्ला करू शकतो आणि विकेट घेऊ शकतो. शमीने हे सिद्ध केले आहे. तो बुमराहसाठी योग्य पर्याय असल्याचे दिसून येत आहे.

 

अर्शदीपचे कौतुक करत सचिन काय म्हणाला

विश्वचषक मोहिमेवर निघालेल्या भारतीय संघात युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग देखील आहे. सचिनचाही त्याच्यावर खूप प्रभाव पडला आहे. सचिन अर्शदीपसाठी म्हणाला, ‘अर्शदीपने खूप अपेक्षा वाढवल्या आहेत आणि तो एक संतुलित गोलंदाज असल्याचे दिसून आले आहे. त्याच्यात एक खास गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे खेळावरची त्याची निष्ठा आणि सातत्य. जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूकडे पाहता तेव्हा तुम्हाला त्याची मानसिकता दिसते.

सचिन म्हणाला, ‘”मला आवडले की अर्शदीपकडे त्याची स्वतःची योजना आणि तो त्याच्याशी प्रामाणिक आहे. या टी-२० फॉरमॅटमध्ये, तुमच्याकडे योजना असणे खूप महत्वाचे आहे, कारण फलंदाज काही नवीन शॉट्स खेळतात. अशा वेळी तुमच्याकडे एखादी योजना असेल, तर ती उत्तम प्रकारे राबवणे चांगले ठरते.”

 

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *