महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ ऑक्टोबर । करोना संसर्गाची साथ आता भारतात नियंत्रणात आली असतानाच दिवाळीपूर्वी देशवासियांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. करोनाचे संकट कमी झाले असले तरी पूर्णपणे नष्ट झालं नाहीये. अनेक देशात करोनाचे रुग्ण पुन्हा वाढले आहेत. करोनाचे रुग्ण वाढण्यामागे करोनाचा एक नवा व्हेरियंट असल्याचं समोर आलं आहे. करोनाचा उपप्रकार असलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा सब व्हेरियंट आढळला आहे. ज्यामुळंच करोनाच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. इतर देशात या व्हेरियंटचा फैलाव होत असताना भारतातही या BQ1 व्हेरियंटची एन्ट्री झाली आहे. (First Case Of Bq1 Omicron)
दिवाळीपूर्वीच भारतात नव्या व्हेरियंटची एन्ट्री झाल्याने चिंता अधिक वाढली आहे. सोमवारी पुण्यात ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट BQ1चा रुग्ण आढळला आहे. याआधी गुजरातमध्ये BF.7 व्हेरियंट सापडला होता. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, BQ1 आणि BF.7 या दोन्ही व्हेरियंटचे म्युटेशन होतं. ज्यामुळं शरिरातील रोग प्रतिकारशक्ती कमी होते.
BQ.1 आणि BQ.1.1 हे ओमिक्रॉनच्या BA.5 सबव्हेरियंटचे दोन उपप्रकार आहेत. हे दोन्ही उपप्रकार धोकादायक असल्याचं बोललं जातं. या उपप्रकारांमुळं अमेरिकेतील करोनाच्या सर्व सक्रिय प्रकरणांपैकी १०% पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात या आठवड्याच्या तुलनेत १७.७ रुग्ण वाढले आहेत. सोमवारी राज्यात २०१ रुग्ण आढळले होते. तर, रुग्ण वाढीचा दर १.८२ टक्के इतका होता. तर, पुण्यात २३ नवीन रुग्ण आढळले आहेत. ठाणे, रायगड आणि मुंबई या तीन शहरात रुग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे. तसंच, दिवाळीत रुग्णांचे प्रमाण वाढू शकते, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं नागरिकांनी दिवाळीत योग्य ती खबरदारी घ्यावी. तसंच, ताप-सर्दी अशी लक्षणे असल्यास वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं अवाहन डॉक्टरांनी केलं आहे.