शहाजीबापूंना विधानपरिषदेची स्वप्नं, दोनशे कोंबड्या देतो, अंडी काढा, शिवसेनेचे शरद कोळी बरसले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ ऑक्टोबर । शिंदे गटातील शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचं सांगत खळबळ उडवून दिली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना आमदार करण्याची मागणीही शहाजी बापूंनी केली. यावरुन युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी शहाजी बापूंवर बरसले. मी त्यांना शंभर-दोनशे कोंबड्या आणून देतो, त्यांनी अंडी काढण्याचं काम करावं, असा सल्ला दिला आहे.

या चाळीस आमदारांनी शहाजी बापू पाटील यांचा राजकीय वापर करून घेतला आहे. त्यांना आता आमदारकी जाईल याची भीती वाटत आहे, म्हणून त्यांनी अभिजीत पाटील यांना ऑफर दिली आहे, असंही शरद कोळी म्हणाले.

शहाजीबापूंना दिवसा स्वप्नं

सांगोला मतदार संघातील आमदार शहाजी बापू पाटील यांना आता दिवसा स्वप्नं पडू लागली आहेत. शिवसैनिक आता यांना सोडणार नाहीत. म्हणून त्यांनी पर्यायी मार्ग सुचवला असून अभिजित पाटील यांना सांगोला मतदार संघातून उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली आहे, अशा शब्दात शरद कोळी यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मला तुमच्या सारखं विधान परिषदेवर पाठवा, अशी जाहीर मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे केली होती. गुरसाळे येथे पार पडेलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजन प्रसंगी ते बोलत होते. काय झाडी, काय डोंगर या संवादामुळे राज्यात चर्चेत आलेल्या आमदार शहाजी पाटील यांनी विधानसभा निवडणूक रणांगणातून काढता पाय घेतला की काय ? अशी चर्चा रंगली आहे.

‘अभिजीत पाटील यांच्यासाठी पंढरपूरमधून परिचारक, मंगळवेढ्यातून अवताडे तर माढयामधून बबनदादा म्हणतंय माझं पोरग भाजपमध्ये पाठवतो. आपलं झाडी डोंगर असं झालंय की आपल्या काय नांदेडमध्ये गेलं की गर्दी, कोकणात गेलं तरी गर्दी. त्यामुळे मला तुमच्यासारखं विधानपरिषदेवर घ्या आणि अभिजीतला सांगोल्यात उमेदवारी द्या’ अशी मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भरसभेत केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *