शिवसेनेने काही केले नाही, मग तू काय म्हशी भादरत होता? भास्कर जाधव यांची भाजपच्या या नेत्यावर वर बोचरी टीका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ ऑक्टोबर । शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आज कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेने काही केले नाही, असे नारायण राणे म्हणतात. मग तू काय म्हशी भदरात होता? अशा बोचऱ्या शब्दात भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. जाधव यांनी राणे यांच्या मुलांकडून सुरू असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. जाधव यांच्या भाषणानंतर कोकणातील राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.

शिवसेना आमदार वैभव नाईक यांना एसीबीने चौकशीची नोटीस बजावली आहे. या नोटिसीविरोधात शिवसेना ठाकरे गटाने मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात शिवसेना नेते अरविंद सावंत, भास्कर जाधव सहभागी झाले होते. या मोर्चाला संबोधित करताना भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलांविरोधात जोरदार हल्लाबोल केला. भाजप नेते निलेश राणे यांनी जाधव यांच्यावर काही दिवसांपूर्वी जोरदार टीका केली होती. त्या टीकेलाही भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

भास्कर जाधव यांनी म्हटले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली नोटीस केवळ वैभव नाईक यांना नाही आली. तर सर्वांना ही नोटीस आली आहे. शिंदे गटात न गेल्याने वैभव नाईक यांना हा त्रास दिला जात असल्याचे जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्रात ४० जणांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केला आणि जे आले नाहीत त्यांना त्रास दिला जात असल्याचे जाधव यांनी सांगितले. आमदार यामिनी जाधव यांच्याकडे किती कोटी आहेत, त्याच्यावर ईडीच्या चौकशी झाल्यात. त्या आज शिंदेगटात आहेत. पूजा चव्हाण महिलेचा खून झाला. या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले. भाजपकडून राठोडांविरोधात रान उठवलं तेच राठोड गद्दार गटात गेले. अनिल देशमुख, नवाब मलिक सारखे मंत्री जेलमध्ये आहेत. अजित पवार यांच्या सोबत सकाळी शपथविधी उरकून घेतला. तेच सरकार असते तर आज नबाब मलिक त्यांना देशद्रोही झाले नसते. भाजपने निरमा पावडरचा कारखाना घेतला आहे. त्यांच्याकडे जे येतात त्यांना स्वच्छ धुवून पक्षात घेतात असे म्हणत जाधव यांनी भाजपला टोला लगावला.

राणेंवर बोचरी टीका
भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे होमग्राउंड समजल्या जाणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात राणेंवर घणाघाती टीका केली. नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचे सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रंदेखील विचारत नाही. भास्कर जाधव यांनी मध्यम, लघु, सुक्ष्म खाते म्हणत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे या तिघांवर टीका केली. शिवसेनेने काही केले नाही, असे नारायण राणे म्हणतात. मग तू काय म्हशी भदरात होता? अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडले. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाज जात असल्याचे सांगितले. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की केरळचे उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले. मात्र, राणेंनी देशात कोकणाची लाज काढली असल्याची घणाघाती टीका केली. यावेळी भास्कर जाधव यांनी राणेंची मिमिक्री करत टीकास्त्र सोडले.

राणेंना बाळासाहेबांचा शाप
नारायण राणे यांना दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचा श्राप लागला असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींचा संदर्भ दिला. नारायण राणे यांना बाळासाहेबांचा शाप आहे. शिवसेना सोडून गेल्यानंतर शिवसेना पक्षावर, उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करतोय. त्यामुळे नारायण राणे पदांसाठी दारोदार भटकणार हा माझा शाप असल्याचे बाळासाहेबांनी सांगितले असल्याचे जाधव यांनी म्हटले. राणे हे पदासाठी दारोदार भटकतात, हा बाळासाहेबांचा शाप असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *