Diwali: पोलीस बांधवांनाही दिवाळी बोनस द्या, मनसेचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ ऑक्टोबर । दिवाळी सणाला देशभरात, राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस देत त्यांच्या कुटुंबाची दिवाळी गोड केली जाते. खासगी क्षेत्रातील, कॉर्पोरेट कंपन्याही कर्मचारी, कामगारांना दिवाळीचा बोनस देत असते. या सर्वांची दिवाळी बोनसमुळे आनंदात जात असली तरी राज्यातील पोलीस विभाग या निर्णयाला अपवाद आहे. करोना काळात जीव धोक्यात घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या राज्यातील पोलिसांना ना बोनस मिळतो ना अॅडव्हान्स, त्यामुळे पोलीस खात्यात दिवाळीला नाराजीचा सूर पाहायला मिळतो. मात्र, मनसेनं दिवाळीला पोलिसांनाही बोनस देण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

सणवार असो, कोणतीही आपत्ती असो की संकट असो, सदैव सतर्क आणि कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील पोलीस बांधवांची दिवाळी त्यांना देखील बोनस देऊन गोड करावी, अशी मागणी पक्षाचे सरचिटणीस मनोज चव्हाण ह्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्र पोलीस बांधव हे सण, उत्सव, नैसर्गिक आपत्तीसह अतिरेकी कारवायांमध्ये कर्तव्य बजावत असतात. गर्दीत वर्दी असते म्हणूनच धर्माचा उत्सव उत्साहात साजरा होतो. त्यामुळेच, सणासुदीच्या काळाततरी महाराष्ट्र पोलिसांना आर्थिक समाधान द्यायला हवे, असे मनोज चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, यंदा दिवाळीला पोलिस बांधवांना बोनस द्यावा, अशी मागणीच पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणूक भाजपने न लढविण्याची मागणी केली होती, ती मागणीही मान्यही करण्यात आली होती.

https://twitter.com/mnsadhikrut/status/1582587482843271168?s=20&t=kz1hC20bs-D90ymV3sInPw

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *