महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – उदगीर – संजीवकुमार गायकवाड – शहरात बाहेर जिल्ह्यातील तसेच बाहेर राज्यामधून आलेल्या नागरिकांना क्वारनटाईन करण्यात येत आहे. या नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उदगीर येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज ( दि.३ ) आढावा बैठक घेतली. या बैठकीला लातुरचे अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, उपविभागीय पोलिस अधिकारी जवळकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगरपालिकेचे मुख्यधिकारी भरत राठोड उपस्थित होते.
उदगीर शहरात मागील आठवड्यात कोरोना पाँझीटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात काही कंटेन्मेन्ट झोन तयार केले आहेत. तेथे नागरिकांना नगरपालिका आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तू , दूध, पाणी व मेडीकल सुविधा घरपोच पुरवित आहे. या भागातील सतरा हजार नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या परिसरासह उदगीर शहरावर ड्रोन मेरा व सी.सी.टीव्ही द्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. शहरात सर्वत्र फवारणी करण्यात आली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरातील कंटेन्मेन्ट झोन मधील एकही व्यक्ती बाहेर यायला नको आहे. आणि शहरातील इतर परिसरातील एकही व्यक्ती कंटेन्मेन्ट झोन मध्ये जायला नको आहे. कंटेन्मेन्ट झोन मधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वेळेवर पोहोच करावे, असे सक्त आदेश बैठकीत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना देऊन, कोरोना संदर्भात उपाययोजना बाबत निधीची कमतरता पडू देणार नाही, असे सांगितले.
पुढील आठवड्यात पर जिल्ह्यातील नागरिक आपल्या जिल्ह्यात व तालुक्यात येतील तेंव्हा प्रत्येकाची आरोग्य तपासणी करुन प्रत्येकाला क्वारनटाईन करण्यात यावे. विनापरवाना येणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यास हयगय करु नये. येणाऱ्या काळात शहरात सुद्धा अँन्टी कोरोना फोर्स (ACF) तयार करावे. स्वस्त धान्य दुकानातून या महिन्यातील धान्य दोन दिवसात उपलब्ध करून देण्यात यावे. या पुढील काळात शहरात पाणी टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा सुचनाही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी बैठकी दरम्यान केल्या.
दरम्यान शहरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यमंत्री संजय बनसोडे हे चिंतेत असून, कोरोना पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या सतत बैठकावर बैठका घेऊन शहरात दिवस रात्र सारखे फिरत आहेत.