महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ ऑक्टोबर । दिवाळी वर्षातून एकदाच येते, पण राजकारणातले फटाके कोणत्याही वेळी फुटत असतात, असे म्हणत शिवसेनेने पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते, असा दावा शिवसेनेने केला आहे. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार?, असा खोचक सवाल शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून विचारला आहे.
…तर शिंदेंनी काय मिळवले?
शिवसेनेने म्हटले आहे की, शिंदे गटाचे बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. शिंदे यांचा रामदास आठवले होईल, हे शिंदे गटातील एका नेत्याने खासगीत केलेले विधान बोलके आहे. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. भाजपचे नेते सरळ सांगतात, “शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्या वेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील.’’ असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले?
भाजप शिंदेंना गुदगुल्या करून मारेल
शिवसेनेने म्हटले आहे की, मुख्यमंत्री शिंदे हे पोलीस खात्याच्या बदल्यांवरून नाराज झाले व सातारा येथील आपल्या गावी निघून गेल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले. ते तितकेसे खरे वाटत नाही. मुख्यमंत्री शिंदे नाराज झाले असले तरी फडणवीस यांना ठोकरून, थोडे रुसून गावी जाऊन बसतील अशी स्थिती नाही. कारण भारतीय जनता पक्षाच्या मेहेरबानीवर त्यांचे मुख्यमंत्रीपद टिकून आहे व शिंदे यांचे राजकीय अस्तित्व त्या मुख्यमंत्रीपदावरच टिकून आहे. त्यामुळे भाजप शिंदे यांना गुदगुल्या करीत मारेल.
शिंदेंसाठी धोक्याची घंटा
शिवसेनेने म्हटले आहे की, भाजपच्याच एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, ‘सरकार शिंदे गटाचे चाळीस आमदार चालवीत आहेत व मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर त्यांचाच ताबा आहे. आमदारांच्या हट्टापुढे आपले मुख्यमंत्री हतबल आहेत. इतर आमदारांची कामे होत नाहीत. शिंदे सरकारची स्थिती ओल्या बाळंतिणीसारखी आहे. थोडा वेळ देऊ त्यांना.’ मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. भारतीय जनता पक्षाने शिंदे व त्यांच्या काही लोकांना ‘ईडी’ वगैरेच्या फासातून तूर्त वाचवले, पण या सगळ्यांना कायमचे गुलाम करून ठेवले. सरकारचे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस घेतात व मुख्यमंत्री शिंदे ते निर्णय जाहीर करतात. आता दिल्लीसही फडणवीस एकनाथ शिंदेशिवाय जातात.
मुख्यमंत्रीपद तात्पुरती व्यवस्था
शिवसेनेने म्हटले आहे की, मुख्यमंत्रीपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे.