![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ ऑक्टोबर । सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. दिवाळीनिमित्त जागोजागी खास फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाई पाहायला मिळते. या काळात मिठाईची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे मिठाई भेसळयुक्त असण्याचाही धोका असतो. सणासुदीचा फायदा घेत मिठाईमध्ये भेसळयुक्त करुन फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. अशा भेसळयुक्त मिठाईचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. त्यामुळे मिठाई खरेदी करताना काळजी घ्या. मिठाई नीट तपासून घ्या.
तज्ज्ञांनी भेसळयुक्त मिठाईबाबत सांगितलं की, काही लोक अधिक फायदा मिळवण्यासाठी मिठाईमध्ये भेसळ करतात. मिठाईमध्ये स्टार्चची भेसळ केली जाते. काही ठिकाणी वाईट दर्जाची मिठाई तयार केली जाते. स्वच्छतेची योग्य काळजी घेतली जात नाही. काही ठिकाणी कमी किंवा वाईट दर्जाचे पदार्थांपासून मिठाई तयार केली जाते. काही ठिकाणी मिठाईमध्ये अरारोट मिसळलं जातं. हे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतं. याचा किडनी आणि लिव्हरवर वाईट परिणाम होतो.
काही लोक मिठाईत भेसळ करण्यासाठी पीठ किंवा इतरही काही पदार्थांचा वापर करतात, हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कधीकधी मिठाईमध्ये फॉर्मेलिन आणि डिटर्जंट देखील मिसळलं जातं. मिठाई जास्त काळ टिकण्यासाठी आणि त्यांना अधिक स्वादिष्ट बनविण्यासाठी हे केले जाते. मात्र हा आरोग्याशी खेळ आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करताना विशेष काळजी घ्या. स्वच्छ आणि चांगल्या दुकानातून मिठाई खरेदी करा.
मिठाईमध्येही फॉर्मेलिनचा वापर केला जातो
कधी-कधी मिठाईमध्ये फॉर्मेलिनचाही वापर केला जातो. फॉर्मेलिन ज्याचा वापर सामान्यतः प्रेतांना दीर्घकाळ टिकवण्यासाठी केला जातो. अशा परिस्थितीत मिठाईमध्ये या रसायनाचा वापर करणे अत्यंत हानिकारक असून ते घातक आहे.
हे लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांसाठी अत्यंत हानिकारक आहे. बाहेरची मिठाई कमीत कमी खावी असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. घरी मिठाई बनवण्याचा प्रयत्न करा. जर बाहेरून मिठाई खरेदी करणार असाल तर जिथे तुम्हाला शुद्धतेची हमी मिळेल अशा चांगल्या दुकानातून मिठाई खरेदी करा.
तीन लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त
अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत भेसळयुक्त पदार्थ जप्त केले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबईतून (Mumbai) सुमारे तीन लाख रुपयांचं संशयित भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आलं होतं. मुंबईतील अन्न आणइ औषध प्रशासनानेही कारवाई केली आहे. दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई कार्यालयाने अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुपावर कारवाई केली आहे.