महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ ऑक्टोबर । देशावरील करोनारूपी संकट जवळपास दूर झाल्यानंतर यंदा सर्वत्र उत्साहात दिवाळी साजरी होत आहे. देशभरात सर्वच ठिकाणी नागरिक आपल्या गावी जाऊन, कुटुंबीसमेवत दिवाळीचा आनंद घेण्यास तयार आहे. तर दुसरीकडे सीमेवरील भारताचे वीर जवान आपल्या देशवासीयांना आनंदात सण-उत्सव साजरे करता यावेत म्हणून आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाचे रक्षण करत आहेत. याचबरोबर हे जवान आपल्या कर्तव्याच्या ठिकाणीच म्हणजेच सीमेवरच आपल्या सहकाऱ्यांसमवेत दिवाळीही साजरी करत आहेत. याशिवाय या जवानांनी देशवासीयांना, “आम्ही आहोत, तुम्ही नि:शंकपणे दिवाळी साजरी करा; जवानाचा अभिमानास्पद संदेशही दिला आहे.
काल(शनिवार) रात्री नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनीही दिवाळीनिमित्त दिवे लावून एकप्रकारे दिपोत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, आम्ही देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात आहोत, तुम्ही नि:शंकपणे दिवाळी साजरी करा, असा संदेशही दिला आहे. जवानांनी याप्रसंगी फटाकेही फोडले.
Jammu and Kashmir | Indian Army soldiers posted along the Line of Control (LoC) in the Akhnoor sector burst crackers & lit earthen lamps as #Diwali festivities began with Dhanteras yesterday pic.twitter.com/ekmaKMJiJr
— ANI (@ANI) October 22, 2022
यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना, “कर्नल इक्बाल सिंह यांनी म्हटले की, मी देशवासीयांना सांगू इच्छितो की चिंता करू नका आणि आनंदात दिवाळीचा सण साजरा करा. मी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांना आश्वस्त करू इच्छितो की आमचे सैनिक सतर्क आहेत आणि सीमेवर लक्ष ठेवून आहेत.”