महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ ऑक्टोबर । कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली असून हा भूकंप शिवसेना नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार असल्याची चर्चा रंगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे सध्या पक्षावर नाराज असून ते बंडाच्या पवित्र्यात असल्याचं सांगितलं जात आहे. कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्याचं कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची ढाल-तलवार हातात घेण्याच्या मानसिकतेत आहेत. ए.वाय. पाटलांच्या उपस्थितीत आज दुपारी १२ वाजता सोळांकूर येथे प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा होत असून याच मेळाव्यात पाटील आपली खदखद व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती आहे.
ए. वाय. पाटील यांच्यावर सध्या राष्ट्रवादीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मात्र पक्षाने ही जबाबदारी दिली असली तरी सातत्याने राजकीय खच्चीकरण केल्याची भावना त्यांची आहे. गेली अनेक वर्षे पक्षासोबत प्रामाणिकपणे काम करुनही योग्य तो सन्मान दिला नाही, अशी त्यांची खदखद आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ए. वाय. पाटील यांची भेट घडवून आणल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांची साथ सोडून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा त्याग करणारे ए. वाय. पाटील हे दुसरे जिल्हाध्यक्ष ठरणार आहेत. यापूर्वी दिवंगत लेमनराव निकम यांनीही २००९ मध्ये केपी पाटील यांची साथ सोडत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपद सोडत प्रकाश आबिटकर यांना साथ दिली होती. यावेळीही तशीच पुनरावृत्ती होण्याचे दाट संकेत मिळत आहेत.