फडणवीसांनी भूमिका मांडली अन् उद्धव ठाकरेंकडूनही सहमती; थेट पुढाकार घेण्याचं आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ ऑक्टोबर । भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या वक्तव्याचा आधार घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने उपरोधिक शब्दांत भाजपला आवाहन केलं आहे. ‘महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव देवेंद्र फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले? असो. उद्या काय होईल असे जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच, लागा कामाला,’ असं आवाहन ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून करण्यात आलं आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर होणाऱ्या टोकदार आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय कटुता कमी झाली पाहिजे, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. याबद्दल भूमिका मांडताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. ‘राज्यात कटुता आहे व ती दूर केली पाहिजे हा विचार देवेंद्र फडणवीस यांच्या मनात येणे हे महत्त्वाचे. फडणवीस हे ‘सागर’ बंगल्यावर खूश आहेत. गेल्यावेळी भाजपने शब्द पाळला असता तर तेच आज ‘वर्षा’वर असते व आम्ही एका नात्याने त्यांच्याकडे फराळास गेलो असतो,’ असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांवर निशाणा साधताना सामनातून अत्यंत आक्रमक भाषा वापरण्यात आली. ‘बेरजेचं राजकारण हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार अशा नेत्यांनी हे बेरजेचे राजकारण केले, ते मोडले कोणी? राजकारणात व्यक्तिगत चिखलफेक करताना कोणतेही धरबंध आता बाळगले जात नाहीत व त्यासाठी भाजपने काही भुंकणाऱ्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे. ते शरद पवारांपासून, ठाकऱ्यांपर्यंत ज्या भाषेचा वापर करतात त्यामुळे राज्याच्या राजकारणातील कटुता कशी कमी होईल?’ असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

दरम्यान, ‘मुंबई महानगरपालिकेतून शिवसेना नष्ट करणे हा विचार महाराष्ट्रहिताचा नाही व शिवसेना नष्ट करण्यासाठी सर्व येरागबाळय़ांची मोट बांधणे हा काही प्रामाणिकपणा नाही. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास विरोध करणे ही भूमिका इतर कोणी घेतली तर त्यास मान्यता असूच शकत नाही, पण फडणवीस यांच्यासारख्या शहाण्याने तशी भूमिका घेणे महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणारे नव्हते,’ अशा शब्दांत ‘सामना’तून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *